Pune Single Screen Cinema Pudhari
पुणे

Pune Single Screen Cinema: पुण्यात एकपडदा चित्रपटगृहांचा अस्त; ३५ पैकी २८ बंद, उद्योग संकटात

ओटीटी आणि मल्टिप्लेक्सच्या दबावामुळे जुनी चित्रपटगृहे बंद; सांस्कृतिक वारसा धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तुटलेल्या खुर्च्या, फुटलेल्या काचा, गवताने व्यापलेले पटांगण, धुळीने माखलेल्या भिंती, फाटलेले पडदे आणि मोडकळीस आलेली प्रवेशद्वारे... एकेकाळी चित्रपटरसिकांच्या गर्दीने फुलणाऱ्या पुण्यातील अनेक एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आज वाईट आहे. पुण्यातील अपोलो, किबे लक्ष्मी, अलका, लक्ष्मीनारायण, नीलायमसारखी अनेक जुनी चित्रपटगृहे कायमस्वरूपी बंद पडली आहेत, तर अनेक चित्रपटगृहांना पडक्या इमारतीचे स्वरूप आले आहे.

पुण्यात फक्त पाच ते सात चित्रपटगृहेच सुरू असून, वाढता खर्च, करांचा बोजा, मल्टिप्लेक्सची स्पर्धा आणि ओटीटी व्यासपीठांचा प्रभाव, यामुळे एकपडदा चित्रपटगृहांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी एकपडदा चित्रपटगृहांच्या मालकांनी राज्य सरकारकडे पुन्हा एकदा केली आहे.

राज्यभरातील बंद पडलेल्या अनेक एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पुण्यातही असेच चित्र आहे. चित्रपटगृहे बंद असतानाही मालमत्ता कर, वीजबिल, पाणीबिल, देखभाल खर्च आणि विविध शासकीय शुल्क भरावे लागत असल्याने चित्रपटगृहचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही जण जोखीम पत्करून चित्रपटगृहे चालवत आहेत. मात्र, त्यांनाही हा व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. दरम्यान, चित्रपटगृहांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी मध्यंतरी बैठक घेऊन पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत काहीच झाले नाही, असे मालकांचे म्हणणे आहे.

एकपडदा चित्रपटगृहमालक दीपक कुदळे म्हणाले की, आर्थिक अडचणींमुळे अनेकांनी चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद केले आहेत. तर, काही जण जोखीम पत्करून चित्रपटगृह चालवत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे.

एकपडदा चित्रपटगृह अभ्यासक नितीन दातार म्हणाले, ‘मालमत्ता कर, वीजबिल, पाणीबिल, कर्मचारी वेतन आणि देखभाल खर्चाचा मोठा बोजा मालकांवर आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही, तर उर्वरित चित्रपटगृहेही बंद पडतील आणि महाराष्ट्राच्या चित्रपटसंस्कृतीचा महत्त्वाचा वारसा नष्ट होईल.’

‘सिनेमा ओनर्स आणि एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे कुणाल मोहोळ यांनी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २८ चित्रपटगृहे बंद झाली आहेत. मल्टिप्लेक्सना सवलती दिल्या जातात. मात्र, एकपडदा चित्रपटगृहांना दिल्या जात नाहीत. सरकारने करमाफीसह दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, असे सांगितले.

राज्य, पुण्यातील चित्रपटगृहांची स्थिती

राज्यातील एकपडदा

  • चित्रपटगृहे (पूर्वी) : १,२००

  • सध्या सुरू : २५०

  • बंद पडलेली : ९५०

  • पुण्यातील चित्रपटगृहे (पूर्वी) : ३५

  • पुण्यात सध्या सुरू : ५ ते ७

  • पुणे-पिंपरी-चिंचवडमधील बंद चित्रपटगृहे : २८

चित्रपटगृहचालकांच्या विविध मागण्या

  • एकपडदा चित्रपटगृहांच्या जागी दुसरा व्यवसाय करण्याची मागणी

  • चित्रपटगृहांवरील विविध कर माफ करावेत

  • सरकारने चित्रपटगृहाच्‍या चालकांशी संवाद साधावा

  • बंद पडलेल्या चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष धोरण जाहीर करावे

एकपडदा चित्रपटगृहांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही समित्या स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे चित्रपटगृहमालक आणि मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
बाबासाहेब पाटील, अध्यक्ष, मराठी चित्रपट असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT