

पुणे: बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचा बोगस व बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री स्वर्गीय अनंतराव थोपटे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आणि नाटकाचे एकाच वेळी दुहेरी बुकिंगचा घोळ प्रशासनाने घातला. या घोळामुळे बाहेर ताटकळलेल्या संतप्त नाट्यरसिकांनी थेट सभेत घुसून गोंधळ घातला. खेदजनक म्हणजे, श्रद्धांजली देण्यासाठी नागरिक मौन बाळगून उभे असताना व व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित असताना प्रशासनाच्या व नाटकाच्या आयोजकांच्या चुकीमुळे हा गोंधळ उडाला.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी ४ ते ७ अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यांना दिलेल्या पावतीवरही बुकिंगची ५ ते ८ ही वेळ नमूद आहे. मात्र, बालगंधर्व प्रशासनाने याच वेळात नाटकालाही परवानगी दिली. शोकसभा लांबल्याने आणि सर्वजण उभे राहून श्रद्धांजली वाहत असताना बाहेर नाटक पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक ताटकळत उभे होते.
अखेर संयम सुटलेल्या नाट्यरसिकांनी थेट मुख्य सभागृहात घुसून शोकसभा बंद पाडण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. प्रेक्षकांनी घातलेल्या या गोंधळामुळे बालगंधर्वमध्ये काही काळ अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रेक्षकांना शांत करण्याची जबाबदारी ही प्रशासन आणि नाटकाच्या आयोजकांची होती. त्यांच्या चुकीमुळे प्रेक्षक ताटकळले. दरम्यान, या गोंधळाबाबत नाटकाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या पावतीवर दिले बुकिंग
या प्रकरणात सांस्कृतिक विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. श्रद्धांजली सभेच्या आयोजकांना जी पावती देण्यात आली आहे ती मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाची आहे. त्यावर बालगंधर्व रंगमंदिर असा शिका मारून ही पावती आयोजकांना देण्यात आली आहे. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता बालगंधर्व सभागृहाच्या पावत्या संपल्याने बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या पावतीवर बालगंधर्वचे बुकिंग करून दिले, असा संतापजनक खुलासा त्यांनी केला.
याबाबत संबंधित आयोजकांशी उपायुक्त यांनी पूर्वीच चर्चा केली होती. मुख्य बालगंधर्व नाट्यगृह श्रद्धांजली सभेसाठी देण्याबाबत फाइल तीन दिवसांपूर्वी आयुक्त सरांकडे पाठवली होती. नाट्यगृहामधील नाटकाचा शो रद्द करण्यास, परंतु थोड्या उशिरा शो सुरू करण्याबाबत संयोजकांनी सहमती दर्शविली होती. पावतीबाबत नेमके काय झाले, त्याची चौकशी करून पुढील उचित कार्यवाही केली जाईल.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त महापालिका
शोकसभेचा वेळ हा चार ते सहा असाच होता. मात्र, वेळ टाकताना स्लॉटनुसार टाकावे लागतात. त्यामुळे आयोजकांना दिलेल्या पावतीवरती पाच ते आठ अशी वेळ लिहिलेली आहे. मात्र, या शोकसभेची कल्पना नाटकाच्या व्यवस्थापकांना दिली होती. तसेच शोकसभेच्या आयोजकांनाही नाटकाच्या वेळेबद्दल माहिती देण्यात आली होती. सातची वेळ दिली होती. नाटकाच्या व्यवस्थापकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला.
राजेश कामठे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर
प्रशासनाने आमच्या कार्यक्रमासाठी रात्री आठपर्यंतची वेळ दिलेली होती. त्यासंदर्भातली पावती आमच्याकडे आहे. ज्यांनी परवानगी दिली, त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला की नाही आम्हाला माहीत नाही. जो काही गोंधळ झालेला आहे, तो प्रशासनाच्या चुकीमुळे झालेला आहे.
संग्राम थोपटे, माजी आमदार