Shriram Lagoo Theatre Festival Pudhari
पुणे

Pune Shriram Lagoo Theatre Festival: पुण्यात श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव; भारतीय रंगभूमीतील नव्या प्रयोगांवर चर्चा

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात रंगकर्मींनी प्रयोगशीलता, बदलती रंगभाषा आणि भारतीय रंगभूमीतील नव्या प्रवाहांवर विचार मांडले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि प्रयोगशीलतेचा सेतू बांधत भारतीय रंगभूमी सातत्याने नवे रूप धारण करत असल्याचे मत देशभरातील विविध रंगकर्मींनी परिसंवाद मांडले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीयांतर्फे आयोजित पहिल्या ‌‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा‌’तील ‌‘थिएटर प्रॅक्टिसेस इन इंडिया - जर्नींज इन एक्सपरिमेंटेशन‌’ या परिसंवादात रंगकर्मींनी आपल्या कलाप्रवासातील प्रयोग, बदलती रंगभाषा आणि नव्या पिढीसमोरील आव्हानांवर मुक्तपणे भाष्य केले. नाट्य महोत्सवाच्या तिसऱ्या सत्रात विविध रंगकर्मींच्या प्रयोगशीलतेचे अनेक संदर्भ उलगडले.

मणिपूर कलाक्षेत्रमचे ज्येष्ठ रंगकर्मी हेनस्नाम टोंबा सिंग यांनी पारंपरिक सादरीकरण, मार्शल आर्ट्‌‍स आणि नटांच्या शारीरिक-मानसिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक काळात समकालीन आशय नव्या रंगभाषेत मांडण्याचे प्रयत्न सुरू असून, नव्या पिढीतील कलाकार या परिवर्तनाचे शिलेदार असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्य दिग्दर्शक डॉ. अभिलाष पिल्लई यांनी ‌‘रंगभूमी हे स्थलांतर असते‌’ या संकल्पनेभोवती आपली मांडणी केली. भाषा, स्थान, परंपरा आणि सामाजिक बदलांनुसार रंगभूमी सतत नवे रूप स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोना काळातील विस्थापनाने असुरक्षितता आणि नैराश्याची भावना निर्माण केली, असे सांगत जुने मोडून नवे शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच रंगभूमीचे स्थलांतर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पपेटियर अनुरूपा रॉय यांनी पपेट्री ही केवळ कठपुतळी किंवा बाहुल्यांचा खेळ नसून व्यापक अभिव्यक्तीचे माध्यम असल्याचे सांगितले. मुंबईस्थित रंगकर्मी यूकी इलिअस यांनी अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि व्यवस्थापन अशा विविध भूमिका सांभाळत केलेल्या आपल्या 30 वर्षांच्या प्रवासाचा अनुभव मांडला. या परिसंवादाचे के. व्ही. अक्षरा यांनीही विचार मांडले. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यावेळी उपस्थित होते.

नृत्याविष्काराने जिंकली मने

नृत्याविष्कार आणि आशयघन नाट्याविष्कार, हे श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ‌‘बोल सखी‌’ या शीर्षकांतर्गत नृत्यांगना ऋतुजा आणि स्वरश्री यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्यातील मैत्रीचे बंध भरतनाट्यम आणि कथक नृत्याच्या माध्यमातून उलगडले. संघर्ष आणि सहकार्य यांचा हा प्रवास काव्य, पत्र आणि भाषेच्या आधाराने शिक्षण, एकता आणि स्त्रियांचे परस्पर सहकार्य इथपर्यंत मांडण्यात आला. उत्तरार्धात ‌‘डू यू नो धिस सॉग‌’ या नाट्याविष्काराने रसिकांना खिळवून ठेवले. हिंदी-इंग््राजी भाषेतील या दीड तासाच्या नाटकाचे सादरीकरण दिल्ली येथील मल्लिका तनेजा यांचे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT