

पुणे: जागतिक घडामोडींमुळे वाढलेले डिझेलचे दर आणि वाढत्या महागाईचा फटका आता थेट शालेय विद्यार्थी वाहतुकीला बसणार आहे. पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या पुण्यात झालेल्या बैठकीत शालेय बसच्या भाड्यात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाषाण रोडवरील लॉयल स्कूलसमोरील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली.
असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या डिझेलचे दर प्रतिलिटर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत. याशिवाय गेल्या वर्षभरात टायर, बॅटरी आणि युरो 6 गाड्यांसाठी लागणाऱ्या ‘ॲड ब्लू’च्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे वाहतूकदारांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला पिंपरी-चिंचवड आणि पुणे बस असोसिएशनचे स्कूल बस विभागाचे प्रमुख रोहिदास दगडे-पाटील, जिल्हा स्कूलबस सुरक्षा कमिटीचे सदस्य सचिन पंचमुख, पिंपरी-चिंचवड संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, सागर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, स्कूल बसमालक आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने शालेय विद्यार्थी वाहतुकीवर आधीच भरपूर निर्बंध लादले आहेत. गाड्यांना जवळपास 30 ते 35 विविध प्रकारचे नियम पाळावे लागतात. त्यासाठी मोठा खर्च होतो. वाहतूकदारांची इच्छा नसतानासुद्धा ही दरवाढ करावी लागत आहे. यातून कोणतीही जादा कमाई किंवा नफा कमविण्याचा आमचा उद्देश नाही. जो खर्च वाढला आहे, तेवढाच निघावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे पालकांनी सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी या दरवाढीला सहकार्य करावे.
राजन जुनवणे, अध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन