पुणे: चोरट्यांनी दत्तवाडी भागातील एका किराणा माल विक्री दुकानाचे शटर उचकटून विविध वस्तू चोरून नेल्याची घटना घडली. तसेच, वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात एका औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २ लाख २३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. (Latest Pune News)
याबाबत आव्हाळवाडीतील 23 वर्षीय औषध विक्रत्याने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औषध विक्रेत्याचे नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात दुकान आहे. चोरट्यांनी मंगळवारी (दि.४ नोव्हेंबर) मध्यरात्री औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटला. चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख २३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक देवगडे तपास करत आहेत.
तर दुसरीकडे दत्तवाडी परिसरातील एका किराणा माल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजार रुपयांच्या विविध वस्तू चोरून नेल्या. याबाबत किराणा माल विक्रेत्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे दत्तवाडीतील म्हसोबा चौकात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून विविध प्रकारच्या वस्तू चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पोलिस हवालदार सचिन अहिवळे तपास करत आहेत.