

बारामती: राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि. ४) जाहीर केला. त्यानुसार हरकत नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर, तर हरकत असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या स्थितीत उमेदवाराच्या हातात प्रचारासाठी केवळ चार दिवस उरतील, अशी स्थिती आहे. (Latest Pune News)
दि. २ डिसेंबर रोजी नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरला प्रचार थंडावेल. ज्या ठिकाणी हरकती दाखल होतील तेथे उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २५ नोव्हेंबर आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होईल. नगरपरिषद निवडणुकीचा विचार करता मोठ्या संख्येने हरकती दाखल होत असतात. या स्थितीत उमेदवाराला प्रभागात प्रचार करण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी हाती राहणार आहे.
निवडणूक खर्चात वाढ
निवडणूक आयोगाने यंदा निवडणूक खर्चात वाढ केली आहे. बारामतीसारख्या 'अ' वर्ग नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १५ लाख रुपये खर्च करता येईल. सदस्यांसाठी खर्चमर्यादा ९ लाख रुपये आहे. 'ब' वर्ग पालिकेत अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार, तर सदस्यांना साडेतीन लाख रुपये खर्च करता येईल. 'क' वर्गमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये, तर सदस्यांना अडीच लाख व 'ड' वर्ग नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराला सहा लाख व सदस्य उमेदवाराला सव्वादोन लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे.