पुणे: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाने पुण्यात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली आहे. गुरुवारच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक बूथवर शिवसैनिकांची अभेद्य फळी उभी करून विजयाचा संकल्प पूर्ण करायचा आहे, अशी माहिती शिवसेना (उबाठा) पुणे शहर प्रमुख संजय थरकुडे यांनी दिली.
कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले, निवडणुकीच्या दिवशी मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाच्या उमेदवारांमार्फत कार्यकर्त्यांची एक सज्ज यंत्रणा कार्यरत असणार आहे. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत मार्गदर्शन करण्याचे काम हे कार्यकर्ते करतील. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, यावर बैठकीत भर दिला.
थरकुडे यांनी सांगितले की, शिवसेना हा शिस्त आणि निष्ठेवर चालणारा पक्ष आहे. पक्षाशी असलेली निष्ठा हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. प्रत्येक शिवसैनिकाने विजयाचा निर्धार करून मैदानात उतरावे. कार्यकर्त्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता, आक्रमकपणे पण शिस्तीत काम करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.