Crime News Pudhari
पुणे

Shivajinagar Court Crime: पुणे शिवाजीनगर न्यायालयाचा परिसर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; ४० वर्षांत खून, गोळीबार अन् टोळीयुद्धाच्या घटना

न्यायाच्या मंदिराबाहेरच रक्तरंजित संघर्ष; १९८४ पासून हल्ल्यांची मालिका, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: न्याय मिळवण्यासाठी जिथे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातात, त्याच शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात वारंवार रक्तरंजित संघर्षाच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आलेल्या आरोपींवर हल्ले, टोळीयुद्धातून गोळीबार, चाकूहल्ले आणि थेट खुनाच्या घटनांनी न्यायालय परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) गेट क्रमांक ४ बाहेर मंदार मारुती किवळे याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने या घटनांच्या मालिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कात्रजमधील शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. शिवाजीनगर न्यायालय परिसरात अशा प्रकारे हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही या परिसरात गोळीबार, खून आणि शस्त्रांनी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

२०१०: न्यायालय परिसरात तरुणाचा खून

मे २०१० मध्ये राहुल रवींद्र नायर (वय २५) याची शिवाजीनगर न्यायालय परिसरात हत्या करण्यात आली होती. दोन गटांमधील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती होती. या घटनेने न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता.

२०१२: न्यायालयाबाहेर गोळीबार आणि चाकूहल्ला

फेब्रुवारी २०१२ मध्ये न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर विजय कार्के (वय २५) याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्या मांडीत गोळी लागली होती. त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाबाहेर दोन व्यक्तींवर लुटीच्या उद्देशाने चाकूहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली होती.

२०१३: बहिणीच्या आत्महत्येच्या वादातून हल्ला

ऑक्टोबर २०१३ मध्ये न्यायालयाच्या परिसरातच अरुण चाकले याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. बहिणीच्या आत्महत्येच्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले होते.

१९८४: बाळू आंदेकर खून

१९८४ मध्ये माळवदकर टोळीने बाळू आंदेकरचा कोर्टात खून केला होता.

१९९५: बलात्‍कारातील संशयित आरोपीवर खुनी हल्‍ला

फेब्रुवारी १९९५ मध्ये अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्‍याप्रकरणात संशयित आरोपी असलेल्‍या शिवाजी नामदेव गिरमे याच्‍यावर खुनी हल्‍ला झाला होता.

२०१९ गँगवॉरमधून गोळीबार

मार्च २०१९ मध्ये शिवाजीनगर न्याकयालयाजवळ टोळीयुद्धातून गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारामागे ‘रावण गँग’च्या सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT