सुनील माळी
ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांची ही कविता त्यांचे चिरंजीव अमिताभ यांच्या आवाजात आपण ऐकली आहे... आगीवरून चालत जाऊन यश गाठण्याची इच्छा बाळगणारा नायक आपल्या डोळ्यांसमोर येतो. पुण्याच्या शिवसेनेकडे पाहिले, की या ओळी नकळत आठवतात. भारतीय जनता पक्षाशी युती नसताना शिवसेनेला लढावी लागणार असलेली गेल्या चार दशकांतली यंदाची ही दुसरी निवडणूक ठरणार आहे. एका बाजूने पक्षाच्या हुकमी मतदारांचे पट्टे निर्माण करण्यात आलेले अपयश, त्यात दुसऱ्या बाजूने भाजपची साथ नाही, तिसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पक्षाचे झालेले दोन तुकडे, हे प्रमुख अडथळे... मात्र, बाळासाहेब ठाकरे या नावावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या, थरारून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज, दांडगा वैयक्तिक संपर्क असलेले मोजके सरदार आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांची थोडीफार का होईना; पण मदत मिळण्याची आशा, या अनुकूल पानांच्या मदतीने अग्निपथ पार करण्याचे दिव्य पक्षाला कराव लागणार आहे.
वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या शिवसैनिकांच्या फौजेनिशी पुण्यात आपले अस्तित्व दाखवणाऱ्या शिवसेनेचे तुरळक नगरसेवक तिच्या स्थापनेनंतर निवडून येत असत. शिवसेनेची भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली ती 1985 मध्ये. ‘केवळ शहरी भागांतील पक्ष’ अशी प्रतिमा असलेल्या भाजपला ग््राामीण भागांत हातपाय पसरण्यासाठी त्या भागांत चांगले जाळे असलेल्या शिवसेनेची जशी गरज लागली, तशीच शहरी भागांत पाया खणण्यासाठी शिवसेनेला भाजपची. अर्थात ‘भाजपबरोबरच्या युतीने शिवसेनेला नेमके काय मिळाले?’ या प्रश्नाच्या राज्यपातळीवरील उत्तरासाठी राज्यशास्त्रातला प्रबंध लिहावा लागेल; पण पुणे पातळीवर युतीचा सेनेला काय फायदा झाला? ते शोधता येते. महापालिकेच्या निवडणुकीत 1985 मध्ये शिवसेनेची भाजपशी युती झाली अन् शशिकांत सुतार आणि तानाजी काथवटे असे दोनच नगरसेवक निवडून आले. त्यानंतर 1992च्या निवडणुकीत दीपक पायगुडे, रामभाऊ पारीख, दिगंबर राऊत, सूर्यकांत लोणकर आदी पाच जागा पक्षाला मिळाल्या. राज्यपातळीवरील राजकारणाचे प्रतिबिंब स्थानिक राजकारणात उतरते. त्यामुळे 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर झालेल्या 1997च्या निवडणुकीत सेनेच्या जागा एकदम तिपटीने वाढून त्या पंधरा झाल्या. महापालिकेच्या त्यानंतरच्या म्हणजे 2002च्या निवडणुकीत तीन जागांचा प्रभाग झाला आणि सेनेच्या जागा आणखी वाढून त्या वीसवर गेल्या. हीच शिवसेनेची पुण्यातली आत्तापर्यंतची सर्वोच्च नगरसेवकसंख्या. या वीस जागा 2007च्या निवडणुकीत सेनेने टिकवून ठेवल्या. मात्र, त्यापुढे सेनेला उतरती कळा लागत 2012 मध्ये त्या जागा पाचने घसरून पंधरा झाल्या. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फटका काँग्रेसला जसा बसला, तसाच शिवसेनेलाही 2017 मध्ये बसल्याने सेना दहावर घसरली.
शिवसेना एका मर्यादेपलीकडे पुण्यात का वाढू शकली नाही ?... एकतर शहर पातळीवर नेतृत्व करणारे खंबीर नेतृत्व उभं करायला सेनेला म्हणजेच त्यांच्या नेत्यांना अपयश आलं. रमेश बोडके यांनी शहराला नेतृत्व दिलं, पण कसब्यात हे नेतृत्व उभं राहतंय म्हटल्यावर राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत त्या पक्षाचे भाजपमधील विरोधक गिरीश बापट यांनी हे नेतृत्व मागे कसं पडेल, अशा चाली रचल्या. दीपक पायगुडे यांच्या काही काळच्या नेतृत्वाचा अपवाद वगळता नेतृत्व नसल्याचा फटका सेनेला बसला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पुण्यात सेना बांधण्यासाठी गंभीर प्रयत्न केल्याचं किमान दिसलं तरी नाही. त्यातही 2007 मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना दूर ठेवण्याच्या निर्धाराने स्थापन झालेल्या पुणे पॅटर्नने अवचित चक्क आर्थिक नाड्या असलेलं स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि शोभेपुरतंच का होईना, पण मान देणारं उपमहापौरपद सेनेच्या पदरात पडलं. असं असलं तरी त्याचा राजकीय लाभ मिळवण्यात सेना अपयशी ठरली आणि अडीच वर्षांची का होईना, पण सत्ता मिळूनही 2012 च्या निवडणुकीत पक्षाची घसरण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयाचा मोठा फटका काँग्रेसला बसला, तसाच तो काही प्रमाणात सेनेलाही बसला.
शहरी भागात सेनेची ताकद वाढण्यासाठी सेनेनं भाजपशी युती केल्याचं कारण सांगितलं गेलं. या युतीमध्ये पुण्यात सेनेला किती फायदा झाला?... युतीनंतर सेनेला मिळालेल्या जागांच्या संख्येकडं पाहिलं तर सेनेला फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. महापालिकेच्या 1985 पासून झालेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या जागांचे आकडे 2, 5, 15, 20, 20, 15 आणि 10 असे आहेत. (त्यात 2017 मध्ये युती झालेली नव्हती.) पुण्यात शिवसेनेच्या मतदारांची नक्की संख्या किती आणि त्या मतांवर हमखास निवडून येणारे भाग कोणते, या प्रश्नांची उत्तरं गुलदस्तातच राहिली आहेत. याचं कारण या पक्षाची स्वतंत्र मतपरीक्षा फारच कमी वेळा झाली आहे. युती म्हणून भाजपचा सेनेला भरभरून फायदा झाला का, या प्रश्नाचं विधानसभेच्या पातळीवरचं उत्तर होकारार्थी असलं तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मात्र होकारार्थी द्यायला जीभ कचरते. ’शिवसेनेचे उमेदवार कसे पडतील ? हेच भाजप पाहात असल्याने युतीमध्ये काही अर्थ नव्हता’, असे शिवसैनिक आता सांगत असले तरी एकापाठोपाठ एक अशा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती का केली, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे राज्यपातळीवर पक्षाचे दोन तुकडे झाल्याचे मानले गेले तरी त्यांची पुण्यातील ताकद आपल्याला मोठा दणका देण्याएवढी नसल्याची उद्धव ठाकरे सेनेची भावना असली तरी काही ठिकाणी उद्धवसेनेला आणि ते ज्या आघाडीत आहेत, त्या आघाडीला फटका नक्कीच बसेल.
..मग, पुण्यातली सेनेची मुख्य ताकद कोणती ? पहिली ताकद म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं की कड्यावरूनही उडी मारण्याची हिंमत असलेल्या कार्यकर्त्यांची विखुरलेली का होईना, पण फौज. स्वत:ची राजकीय ताकद आणि आपापल्या भागात जबरदस्त लोकसंपर्क असलेले सुतार कुटुंब, संजय भोसले, वसंत मोरे, मोकाटे कुटुंब तसेच आधी पक्षात असलेले आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेलेले रवींद्र धंगेकर आदी सरदार... ही सेनेची जमेची बाजू. या शिदोरीच्या जोरावर पुण्यात शिवसेना किती यश मिळवेल ?... उद्धव आणि राज हे दोन ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्याचा फायदा होईल, असे सेनेचे गणित आहे. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरीच्या महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याच्या कल्पनेवर मात्र शिवसैनिक नाक मुरडतात. ‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खूपच शैथिल्य आले आहे. त्यामुळं त्यांच्याच उमेदवाराच्या निवडणुकीच्या केंद्रावर ते दुपारी तब्बल बारा वाजता पोहोचलेले आम्ही पाहिले आहेत, त्यामुळे ते आम्हाला काय मदत करणार’ असा शिवसैनिकांचा सवाल आहे. तसेच शरद पवार यांची ताकद ग्रामीण भागात असून, तिथे शिवसेनेचे उमेदवार अभावानेच आहेत. त्यामुळे उद्धव-राज युतीलाच शिवसैनिकांची पसंती आहे.
...या सर्व विश्लेषणाची गोळाबेरीज सांगायची तर... गेल्या म्हणजे 2017च्या निवडणुकीतील शिवसेनेच्या निवडून आलेल्या दहा आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन जागा अशा बारा जागांमध्ये किमान बारा ते पंधराची तरी भर घालण्याची आकांक्षा खासगीत बोलणारे शिवसैनिक बाळगून आहेत......एकेकाळी मराठी तरुणांना बँकेत नोकरी मिळण्यासाठी ‘मद्राशांच्या लुंग्या फेडा’ असे म्हणत भांडणाऱ्या, रुग्णवाहिकांसारख्या सामाजिक उपक्रमात पुढे असणाऱ्या आणि नंतरच्या काळात हिंदुत्ववादाची कास धरलेल्या या लढाऊ संघटनेला शुभेच्छा देण्यापलीकडे आपल्यासारखा सामान्य पुणेकर दुसरं काय करणार ?...