पुणे: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 25 उमेदवारांची प्रभागनिहाय यादी भाजपकडे दिली आहे. त्या यादीनुसार शिवसेनेला जागा देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील व विजय शिवतारे यांच्यात बोलणे झाले. मात्र, पाटील यांनी याबाबतचा निर्णय वरिष्ठस्तरावरून होईल, असे जाहीर केले.
त्यानुसार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे याबाबत अंतिम निर्णय घेतील. सेनेला 47 जागांची अपेक्षा आहे; परंतु शिवसेना 25 जागांवर ठाम आहे, असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी व्यक्त केले. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करीत आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. गोऱ्हे म्हणाल्या, ‘भाजपने देऊ केलेल्या 15 जागा शिवसेनेला मान्य नाहीत. आमची प्रभागनिहाय यादीबाबत बैठक झाली आहे.
बैठकीला विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागूल उपस्थित होते. याबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील. नगरपरिषद निवडणुकीतील विजयानुसार पालिका निवडणुकीत आम्हाला सरासरी 47 जागा अपक्षित असतानाही आम्ही 25 जागा मागितल्या आहेत. या निवडणुकीत सन्मानजनक युती व्हावी,अशी अपेक्षा आहे. अंतिम निर्णय शनिवारी रात्रीपर्यंत होईल.” पुण्यातील एका हॉटेलमध्ये शनिवारी शिवसेनेची बैठक सुरू होती. त्या बैठकीत वादावादी झाल्याने प्रमोद भानगिरे निघून गेले. त्याबाबत विचारले असता, डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आमच्यात राजकीय मतभेद नाहीत. शिवसेनेच्या चौकटीत पक्षाचे नेते काम करतात.
जेथे संघटन चांगले, त्या जागा आम्ही घेणार
पुण्यात इतर पर्याय काय, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. उमेदवार आमचे नेते ठरवतील. ज्या ठिकाणी आमचे संघटन चांगले आहे, त्या जागा आम्ही घेणार आहोत. कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील असतात. राजकारणात या गोष्टी अवघड आणि अपरिहार्य असतात. कार्यकर्त्यांनी पक्षाचे नियम आणि शिस्त, याची जाणीव ठेवावी, असे देखील गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.