Exam Paper Pudhari
पुणे

Maharashtra SET Exam 2026: SET परीक्षा 2026: पुणे विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर; 26 जुलैला परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून 26 जुलै 2026 रोजी परीक्षा होणार आहे. अर्ज प्रक्रिया 2 जूनपासून सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

त्यासाठी उमेदवारांना येत्या 2 ते 16 जूनपर्यंत नियमित शुल्कासह, तर 17 ते 19 जूनपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यापीठातर्फे दरवर्षी सेट परीक्षा आयोजित केली जाते. अनेक विद्यार्थी सेट परीक्षा केव्हा आयोजित केली जाणार याकडे डोळे लावून होते. अखेर विद्यापीठाने अधिकृतपणे यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 26 जुलै रोजी राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व गोवा राज्यातील पणजी या शहरांमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्ज विद्यापीठाकडे पाठवू नये, अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. सेट परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये नियमित शुल्क असून, 1300 रुपये विलंब शुल्क आहे, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नियमित शुल्क 650 एवढे असून, विलंब शुल्क 1 हजार 150 एवढे आहे.

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी सेट विभागाच्या संकेतस्थळावर सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा शुल्क भरूनही ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याचा पुरावा सेट विभागाकडे ईमेलद्वारे पाठवावा. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला पुन्हा त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT