Pudhari
पुणे

Pune School Crime : पुण्याच्या शाळेतील धक्‍कादायक प्रकार; तीन वर्षांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडले

सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ केल्याने तसेच नंतर रेकॉर्डिंग ओव्हरराईट झाल्याचे सांगितल्याने पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचाही आरोप पालकांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

पुणे : शाळेत मस्ती करतो, या कारणावरून अवघ्या तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावरील एका पूर्वप्राथमिक शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षिका मनिता बेदी आणि शाळेच्या व्यवस्थापिका सोनाली देशमुख यांच्याविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ केल्याने तसेच नंतर रेकॉर्डिंग ओव्हरराईट झाल्याचे सांगितल्याने पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचाही आरोप पालकांनी केला आहे.

सोलेस पार्क, बीटी कवडे रस्ता परिसरातील एका ३६ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ११) मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा शाळेत नर्सरीमध्ये शिकत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पालकांनी मुलाला शाळेत सोडले होते. दुपारी सव्वा दोन वाजता शाळा सुटल्यानंतर त्याला घरी नेण्यासाठी आई शाळेत गेली. त्यावेळी शिक्षिकेने मुलाने मस्ती केल्यामुळे त्याला एका खोलीत बंद करून ठेवल्याचे सांगितले.

घाबरलेल्या मुलाने रडत रडत शिक्षिका मनिता मॅम यांनी आपल्याला शाळेच्या बाथरूममध्ये बंद केल्याचे आईला सांगितले. याबाबत आईने शिक्षिकेकडे विचारणा केली असता, मुलगा खूप मस्ती करत होता आणि दुसरीकडे जागा नसल्याने त्याला काही वेळ बाथरूममध्ये बंद केल्याचे उत्तर दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी पालकांनी शाळेकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र, व्यवस्थापिका सोनाली देशमुख यांनी विविध कारणे सांगून फुटेज दाखविण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पालकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी त्यांना फुटेज दाखविण्यात आले. त्यामध्ये शिक्षिका मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवताना दिसल्याचा दावा पालकांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी, २२ सप्टेंबर रोजी पालकांनी या फुटेजची प्रत पेनड्राइव्हमध्ये मागितली. त्यावेळी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ओव्हरराईट झाल्याने ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२७(२), ३(५) आणि अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ मधील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित म्हस्के करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT