School Bus Pudhari
पुणे

Pune School Bus Safety RTO: शालेय बस सुरक्षिततेसाठी आरटीओचे कठोर निर्देश; विशेष तपासणी मोहीम सुरू

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवीन शैक्षणिक वर्ष काही दिवसांतच सुरू होत आहे. शाळा सुरू होताच गजबजणाऱ्या शालेय बस आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आरटीओ प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या फिट ठेवा, असे आदेश आरटीओने जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाला पत्राद्वारे दिले आहेत.

बेकायदा व विनापरवाना वाहनांतून पाल्यांना पाठवू नका

शाळा प्रशासनाने प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करून नियमांचे ऑडिट करावे, अशा सूचनाही आरटीओने दिल्या आहेत. बेकायदेशीर आणि विनापरवाना चालणाऱ्या व्हॅन किंवा रिक्षांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू नका, असे आवाहन आरटीओने शाळांसोबतच पालकांनाही केले आहे. शाळा सुरू होताच आरटीओकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

काय आहेत आरटीओचे निर्देश?

आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व शालेय वाहनांचे फिटनेस (योग्यता प्रमाणपत्र) तपासून घेणे बंधनकारक आहे. गाड्यांची तांत्रिक स्थिती उत्तम असणे, ब्रेक, हेडलाईट, टायर सुस्थितीत असणे आणि वाहनांना स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) लावलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्व शालेय बस आणि व्हॅनचे आरटीओ फिटनेस प्रमाणपत्र वैध असणे गरजेचे आहे. चालकाकडे वैध परवाना असावा आणि त्याची पोलिस पडताळणी केलेली असावी. वाहनात प्रथमोपचार पेटी आणि अग्निशामक यंत्रणा कार्यरत स्थितीत असणे सक्तीचे आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसमध्ये महिला अटेंडंट असणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि अनधिकृत वाहनातून (पांढरी नंबर प्लेट असलेली वाहने) विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यावर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच शालेय वाहनांची तपासणी करण्यासाठी आरटीओची विशेष भरारी पथके तैनात केली जाणार आहेत. पालकांनीही आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना ते वाहन अधिकृत आणि सुरक्षित आहे का, याची खात्री करावी. शालेय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि अशा वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
संदीप खडसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT