Sassoon Hospital Pudhari
पुणे

Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात धर्मप्रचाराचा आरोप; दाम्पत्याविरोधात बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

रुग्ण, नातेवाईक आणि वारकऱ्यांना पत्रके वाटल्याचा दावा; पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांसह वारकऱ्यांना धार्मिक पत्रके वाटून ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांकडून रुग्णांना ''येशूची प्रार्थना केल्यास लवकर बरे व्हाल'' असे सांगून धर्मप्रचार केला जात होता.

सुनिल मलेपेरमिल वर्गीस (वय ५६) आणि प्रतिभा सुनिल वर्गीस (वय ५५, दोघेही रा. कल्याणीनगर, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषीकेश किशोर पांडे (वय २२, रा. भवानी पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी (दि. १०) मित्रासह ससून रुग्णालयात गेले होते. त्यावेळी ओपीडी क्रमांक ७२ समोर एक महिला व एक पुरुष रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ''कृपासनम'' नावाचे पत्रक वाटत होते. तसेच, "उपचारापेक्षा येशूची प्रार्थना केल्यास लवकर बरे व्हाल," असे सांगून धर्मप्रचार केला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पत्रकात येशूच्या प्रार्थनेमुळे आजार बरे झाले, नोकऱ्या मिळाल्या तसेच अपत्यप्राप्ती झाल्याचे अनुभव नमूद करण्यात आले होते.

फिर्यादीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त उपचारासाठी आलेल्या काही वारकऱ्यांनाही संबोधित करून ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले जात होते. संशय आल्याने फिर्यादीने संबंधितांना विचारणा केली.

उपस्थित लोकांमध्ये ख्रिश्चन धर्माविषयी आकर्षण निर्माण व्हावे, या उद्देशाने भुलथापा देत ''कृपासनम'' पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच हिंदू धर्माचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT