पुणे: विमाननगर येथील म्हाडा कॉलनी परिसरात काम करताना गंभीर जखमी झालेल्या स्वच्छता कर्मचारी अंजना अशोक शिंदे यांच्यावर आरामाऐवजी काम करण्याची वेळ आली आहे. घंटागाडीतून कचरा कॉम्पॅक्टरमध्ये टाकत असताना कॉम्पॅक्टरचा जोरदार धक्का बसल्याने त्यांच्या कमरेला तीव दुखापत झाली होती.
यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना तब्बल 20 दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ठेकेदाराने कामावर न आल्यास पगार नाही, अशी भूमिका घेतल्याने शिंदे या वेदना सहन करीत रोज कामाला जात आहेत.
26 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला. त्यानंतर आजवर त्यांनी 8 ते 10 हजार रुपये खर्च स्वतःच्या खिशातून केले आहेत. दुखणे वाढण्याची भीती, घरातील आर्थिक जबाबदाऱ्या आणि पगार बंद होण्याची भीती, यामुळे त्यांनी उपचारांपेक्षा कामाला प्राधान्य दिले. दरम्यान, कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेने या प्रकाराची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
शिंदे यांना सर्व वैद्यकीय खर्चाची भरपाई आणि सुट्टीदरम्यानचे वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेने ठेकेदाराला सूचना केल्याचे सांगितले असले तरी, अद्याप कोणतीही आर्थिक मदत किंवा सुरक्षा-लाभ मिळाला नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले. यामुळे पोटाची आग आणि घर चालविण्याची जबाबदारी यांच्यात अडकलेल्या शिंदे या आजही वेदनाशामक औषधे घेऊनच कष्टाची कामे करीत आहेत.
वेतन वाढले; पण सामाजिक सुरक्षा गेली
दिवाळीनिमित्त महापालिकेने कंत्राटी सेवकांच्या वेतनात वाढ केली. रजा वेतन, बोनस आणि घरभाडे, यासाठी केलेल्या वाढीनंतर अनेक कामगारांचे मासिक वेतन 21 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. वेतन 21 हजारांपर्यंत असताना कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत ठेकेदार व कामगार दोघांनी थोडी रक्कम भरून मोफत वैद्यकीय सुविधा, अपघात विमा व विविध सामाजिक सुरक्षा लाभ मिळत होते. आता ही मर्यादा ओलांडल्याने हजारो कामगारांचा ईएसआयसीचा लाभच बंद झाला आहे. सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित राहिलेल्या कंत्राटी कामगारांसाठी केंद्र सरकारने वेतनमर्यादा 25 हजार करण्याची गरज निर्माण झाल्याचे कामगार संघटनांचे मत आहे.
हालचाल करताना खूप त्रास होतो. चालणेही कठीण झाले आहे. घर चालवणारी मी एकटीच असल्याने पगार न मिळाल्यास संसार थांबेल, म्हणूनच वेदना सहन करून कामाला जात आहे. डॉक्टरांनी 20 दिवस आराम सांगितला होता.अंजना अशोक शिंदे, स्वच्छता कर्मचारी