पुणे/कसबा पेठ : त्या नेहमीप्रमाणे कचरा गोळा करायला निघाल्या... त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली... बॅग उघडल्यानंतर त्यात औषधांसोबत रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले... त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अन् अखेर ज्या व्यक्तीची ही पैशाने भरलेली बॅग होती, ती व्यक्ती सापडली. त्यांनी ती पैशाने भरलेली बॅग त्या व्यक्तीला परत केली अन् दहा लाख रुपयांनी भरलेली ही बॅग त्या व्यक्तीला परत मिळाली.
ही कहाणी आहे कचरावेचक अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाची. जिथे लोक पैशांसाठी एकमेकांच्या जिवावर उदार होतात, अशा जमान्यात रस्त्यावर सापडलेली दहा लाख रुपये असलेली बॅग परत करून अंजू यांनी समाजाला असे प्रामाणिक कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. अंजू यांच्या प्रामाणिकपणाचे सगळीकडून कौतुक होत आहे.
अंजू माने या स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक आहेत. नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करीत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉइंटला आणताना सकाळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे अंजू माने यांच्या लक्षात आले. गेल्या 20 वर्षांपासून सदाशिव पेठ भागात अंजू ह्या काम करीत असल्याने त्यांना या भागातील नागरिक ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने ही बॅग कोणाची आहे? याबाबत चौकशी सुरू केली.
दरम्यान, एक व्यक्ती बैचेन अवस्थेत काहीतरी शोधत असल्याचे अंजू यांना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला पिण्यास पाणी दिले आणि नंतर त्यांना बॅग दाखवत ही हरवलेली बॅग त्यांचीच आहे का? याची खात्री करून घेतली. सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित झाल्यावर दहा लाख रक्कम असलेली बॅग त्यांनी त्या व्यक्तीला परत केली. बॅग परत मिळताच त्या व्यक्तीच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर अंजू यांच्या मनात समाधान होते. परिसरातील नागरिकांनी देखील अंजू यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी त्यांना साडी आणि काही रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला.
कचरासंकलनादरम्यान सापडलेले 10 लाख रुपये मूळ मालकाला परत केल्याबद्दल ‘स्वच्छ’च्या कर्मचारी अंजू माने यांचा सन्मान करताना कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आतिक सय्यद, मुकादम सुदाम सावंत, स्वच्छ कॉर्डिनेटर नवनाथ कदम, पूजा मॅडम, शुभम डावरे आदी.