पुणे/ शिरूर: रांजणगाव गणपती गावाच्या हद्दीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हे हत्याकांड महिलेच्या नातेवाइकानेच अनैतिक संबंधातून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अहिल्यानगर परिसरातून अटक केली. गोरख बोखारे (36, रा. सदरवाडी, शिरुर) असे त्याचे नाव आहे.
आरोपीला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर स्वाती सोनवणे (25, रा. माजलगाव, जि. बीड), स्वराज (3) आणि विराज (1) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना 25 मे 2025 रोजी खंडाळे गावाकडे जाणार्या रस्त्यावर महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. (Latest Pune News)
गुंतागुतींच्या या खून प्रकरणाचा उलगडा करून पोलिस कसे आरोपींपर्यंत पोचले याची माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांची ओळख पटली नव्हती. ओळख पटवण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत 28 अंमलदारांची सहा पथके पाठविण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली.
तेव्हा माजलगाव पोलिस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे आढळले. मृत महिलेचे वर्णन खून झालेल्या महिलेशी जुळत होते. पतीकडे चौकशी केल्यानंतर ती आळंदी येथे आई-वडिलांकडे गेल्याचे समजले. आळंदीत चौकशी केली असता, ती गोरख याच्याबरोबर गेली असल्याची माहिती मिळाली.
मृत स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी आहे. स्वाती आणि तिच्या नवर्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. हे वाद नेहमी गोरख सोडवत होता. यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. चारच महिन्यांपूर्वी गोरखने त्यांच्यातील वाद मिटवला होता.
पेट्रोल टाकून मृतदेह जाळले
स्वाती आळंदीला आल्यावर तिने गोरखकडे विवाहाचा तगादा लावला. यामुळे वाद झाल्यावर गोरख तिला आणि दोन्ही मुलांंना दुचाकीवर घेऊन 23 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणार्या सुनसान रस्त्यावर रात्री घेऊन आला. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाले. दरम्यान दोन्ही मुले झोपली असताना त्याने स्वातीचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून खून केला. तेव्हा झोपेतून उठलेल्या विराजचाही त्याने गळा आवळला. यानंतर स्वराजचाही गळा आवळून खून केला.
मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्याने महामार्गावरील एका पेट्रोलपंपातून पेट्रोल आणले. हे पेट्रोल तिघांच्याही मृतदेहावर टाकून पळ काढला. यानंतर तो नेहमी प्रमाणे चालक म्हणून रांजणगाव येथील एका कंपनीतील गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला.
टॅटू अन् अडीचशे सीसीटीव्ही
मृतदेह अर्धवट जळालेले असल्याने तसेच आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्यात मोठा पाऊस झाल्याने इतर पुरावे देखील हातातून सुटले होते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. यासाठी पूर्ण राज्यभर पथके रवाना करण्यात आली होती.
तसेच 250 सीसीटीव्ही आणि 16,500 भाडेकरू तपासण्यात आले. चाकण, तळेगाव, रांजणगाव, सुपा आदी एमआयडीसीतील कामगारांकडे चौकशी करण्यात आली. मृतदेहाच्या हातावरील टॅटूद्वारे बँकांकडून खातेदारांची माहिती घेण्यात आली. तर आशा वर्कर आणि आरोग्य विभागातील सेविकांकडून लहान मुलांच्या अनुषंगाने माहिती घेण्यात आली. त्यावेळी महिलेची ओळख पटली.
...यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिराजदार, एसडीपीओ प्रशांत ढोले, बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, विश्वास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहीते, निळकंठ तिडके, अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, विक्रम तापकीर, संदीप वारे यांच्या पथकाने केली.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. खून झालेल्या महिलेस इतरांची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून महिलेची ओळख पटवून या खुनाचा छडा लावला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.-संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण