पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. गाळ्यांसमोर टाकलेल्या फळभाज्यांसह पालेभाज्यांवर जनावरे बिनधास्त ताव मारताना दिसून येतात. बाजारात खाण्यास मिळत असल्याने तरकारीसह भुसार बाजार हे जनावरांचे हक्काचे ठिकाण बनले आहे.
शहरात यापूर्वी मोकाट जनावरांकडून हल्ला करण्याच्या घटना घडल्या असतानाही बाजारातील जनावरांच्या वावराकडे बाजार समितीचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. तसेच, प्रशासन जनावरांकडून स्वच्छता मोहीम राबवित आहे का? असा प्रश्नही बाजार घटकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Pune News)
मार्केटयार्डात भुसार विभागासह तरकारी, कांदा- बटाटा व फळ विभागात मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. तरकारी विभागात शेतमाल असेल त्याठिकाणी जनावरे धाव घेत आहेत. यामुळे बाजार घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारातील व्यवहार सुरू असताना घोळक्याने ही जनावरे बाजारात दाखल होत आहेत. याखेरीज भुसार बाजारातही या जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणे, घोळक्याने उभे राहणे यामुळे बाजारघटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारात आपली गुरेढोरे सोडून वाहतूक व बाजारघटकांना अडचण निर्माण करणार्या मालकांविरुद्ध बाजार समितीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, या समस्येपासून बाजार घटकांची सुटका करण्यात प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने बाजार समिती हतबल झाली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
बाजार घटकांवर हल्ला केल्यास प्रशासनाला जाग येणार का?
मार्केट यार्डात दररोज हजारो बाजार घटकांची वर्दळ राहते. या वेळी एखादे जनावर उधळल्यास त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात लष्कर परिसरात एका म्हशीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पुरुष व महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकारे मोकाट जनावरांनी बाजार घटकांवर हल्ला केल्यास प्रशासनास जाग येणार आहे का? असा सवाल बाजार घटकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
बाजार आवारात मोकाट फिरणार्या जनावरांवर जप्तीची कारवाई करून ती गोशाळेत दान करण्यात येतील. याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करून जनावरांची महाापलिकेच्या कोंडवाड्यात रवानगी करण्यात येईल. बाजार आवारात मोकाट जनावरे येऊ नये, यादृष्टीने प्रवेशद्वारावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती