पुणे: पुणे विमानतळ प्रशासनाने पावसाळ्यासाठी कंबर कसली आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विमानतळ प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात ड्रेनेजलाइन आणि टर्मिनलच्या छताच्या स्वच्छतेपासून ते धावपट्टीच्या डांबरीकरणापर्यंत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत.
मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसात पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलला गळती लागली होती आणि परिसरात पाणी साचले होते. त्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’कडून पुणे विमानतळ प्रशासनाशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी विमानतळ प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली असून, आगामी पावसात प्रवाशांना कोणताही त्रास होणार नसल्याचे या वेळी बोलताना सांगितले. (Latest Pune News)
कोणत्या उपाययोजना केल्या?
परिसरातील सर्व ड्रेनेजलाइनची तसेच टर्मिनलच्या छताची स्वच्छता केली आहे. यामुळे पावसाचे पाणी साचणार नाही आणि त्याचा निचरा योग्य प्रकारे होईल.
जिथे गरज होती, त्या भागात धावपट्टीचे डांबरीकरण पूर्ण केले असून, यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, यासाठीचे काम पूर्ण केले आहे.
टर्मिनल इमारतीमधील अंतर्गत लीकेजची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती केली आहे. यामुळे टर्मिनलमध्ये पाणी झिरपणार नाही आणि कोठेही गळतीची समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
सर्व आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनांची तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री केली आहे.
धावपट्टी आणि विमानतळ परिसरात मार्गदर्शक असलेल्या पिवळ्या रंगाने पट्ट्यांची आखणी केली आहे.
आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही मान्सूनपूर्व तयारी केली आहे. प्रवाशांना यापुढे पावसामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन कामे करण्यात आली आहेत. परिसरात पाणी साचणार नाही आणि टर्मिनलमध्ये पाणीगळती होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आम्ही गेले काही दिवस या कामात गुंतलो होतो. आता विमानतळ मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
पुणे विमानतळ प्रशासनाने मान्सूनसाठी पूर्ण दक्षता घेतल्याचे दिसून येते. पावसामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये किंवा प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी ही तयारी महत्त्वाची आहे. चांगले काम झाले, पावसात विमानतळावर पाणी साचते, तेव्हा खूप त्रास होतो. आता ही तयारी पाहून आनंद झाला.
- सुनील जायभाये, विमान प्रवासी