RTO Portal Outage Pudhari
पुणे

Pune RTO Vahan Portal: पुणे आरटीओचे ‘वाहन’ पोर्टल पुन्हा ठप्प; वाहन हस्तांतरणासह अनेक कामांना ब्रेक

हॉर्स पॉवर आणि व्हील बेसची माहिती रिकामी राहत असल्याने अर्ज सबमिट होईना; पासिंग, रिक्षा परमिट नूतनीकरण आणि लायसन्स परीक्षांवरही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महिनाभर ठप्प झालेले प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) वाहन हे पोर्टल पंधरा- वीस दिवसांपूर्वी सुरू झाले खरे. परंतु, आता त्यामध्ये पुन्हा एरर येऊ लागली असून, वाहनधारकांची सर्वच कामे पुन्हा खोळंबू लागली आहेत. वाहन हस्तांतरणाचे अर्ज भरताना या अर्जातील हॉर्स पॉवर व व्हील बेसबाबतच्या माहितीचे रकाणे मोकळेच (एम्पटी) राहू लागल्याने एम्पटी रकाण्यांच्या कारणास्तव हे अर्जच आता सबमिट होत नाहीत. सबब वाहन हस्तांतरणाबरोबरच इतरही अनेक कामे ठप्प झाली आहेत.

नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) मार्फत आरटीओला वाहन या पोर्टलबरोबरच परिवहन विषयक माहिती तंत्रज्ञान सेवा आणि डिजिटल सुविधा पुरविण्यात येते. या सुविधांमध्ये गरजेनुसार सतत काही बदल वा सुधारणा करण्यात येत असतात. असे अपडेशन सुरू असले की या पोर्टलचा वेग मंदावतो, हा नेहमीचाच अनुभव आहे.

त्यामुळे परिवहन विषयक सर्वच कामांमध्ये अडथळे येतात. वाहन या पोर्टलमध्ये येत असलेल्या अडचणींबाबतच्या तक्रारी गेल्या दोन तीन दिवसांपासून वाढल्या असल्याचे आरटीओतील संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वाहन या पोर्टलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणी येत असल्याचे काही एजंटांनी दै. 'पुढारी'च्‍या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

वाहनाच्या पासिंगचे कामही गेले अनेक दिवस बंद असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या एटीएस यंत्रणेवर पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांच्या चाचण्यांमध्येही अनियमितता दिसून आल्याने अनेकांनी आपली वाहने अन्य शहरांतून पासिंग करवून घेण्यास पसंती दिली असल्याचे एका ज्येष्ठ एजंटने सांगितले. पासिंग संदर्भातील अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी मार्केट यार्डातील टेम्पो व्यावसायिकांनीही नुकतीच अधिकाऱ्यांची भेट घेतली.

पोर्टलमध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे लर्निंग लायसेन्स संपण्यापूर्वी वाहन चालविण्यासाठी द्यायच्या परीक्षेची वेळही मिळत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. वाहन हस्तांतरणाबरोबरच रिक्षा परमिटचे नूतनीकरण, कर्जाचा बोजा उतरविणे (एचपी कॅन्सलेशन), विधवेच्या नावावर होणारे हस्तांतरण अशी कामेही ठप्प झाली असल्याचे रिक्षांच्या संबंधित कामे पाहणाऱ्या एका संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT