पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या हद्दीतील पुणे-सातारा, पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर, पुणे- मुंबई या प्रमुख महामार्गांवर बेशिस्त वाहनचालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे बेशिस्तांना लगाम लागण्यास मोठा हातभार लागत आहे.
जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 या चार महिन्यांच्या कालावधीत आरटीओकडील वायुवेग पथकाने तब्बल 34 हजार 126 वाहनांवर कारवाई करून 6 कोटी 37 लाख 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आरटीओने चांगलाच चाप लावल्याचे दिसत आहे. (latest pune news)
कारवाईतील प्रमुख बाबी...
सर्वाधिक कारवाई फिटनेस नसलेल्या वाहनांवर झाली आहे, त्यांची संख्या 2 हजार 323 आहे. यामुळे रस्त्यावर धोकादायक वाहने धावण्यावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
त्यापाठोपाठ’परमिट नसलेल्या (विनापरवाना प्रवासी वाहतूक) खासगी प्रवासी वाहनांवर मोटार वाहन कायदा 66/192 ए नुसार 1 हजार 016 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) नसलेल्या वाहनांवर सर्वाधिक तब्बल 4 हजार 975 वाहनांवर मो. वा. कायदा 115 (2) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
‘नो-स्टॉपेज’ असलेल्या ठिकाणी थांबणार्या 301 वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या 38 वाहनांवर आणि ’रॅटलिंग बॉडी’ असलेल्या 49 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
‘विना नंबरप्लेट’ असलेल्या 18 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
‘आरटीए परवान्याशिवाय जाहिरात’ करणार्या 19 वाहनांवर कारवाई झाली आहे.
शहर, जिल्हा आणि महामार्गावरच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू आहेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मागील चार महिन्यांत केलेली कारवाई हे त्याचेच उदाहरण आहे. आमचे वायुवेग पथक यापुढेही अधिक प्रभावीपणे काम करेल आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करीत राहील.- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे