

पुणेः भरधाव थारचालकाने कोथरूड येथील निंबाळकर चौकात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या पाच दुचाकी उडविल्या. या अपघातस्थळी कोणी उभे नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी, अलंकार पोलिसांनी ऋषी पुजारी (वय.31,रा.कोथरुड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले आहे. पुजारी हा हॉटेल व्यवसायिक आहे. त्याने मद्यप्राशन केले होते का याबाबत देखील त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता रोकडे यांनी सांगितले. (latest pune news)
याबाबत विश्वेष विजय देशपांडे (वय.41,रा.पौड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.10) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास निंबाळकर चौक कोथरुड येथील युफोरिया बाय खेळीया या दुकानासमोर घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशपांडे यांचे निंबाळकर चौकात खेळणी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर पार्किंग आहे. तेथे काही लोकांनी दुचाकी पार्क केल्या होत्या. मोठा आवाज झाल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा, एका काळ्या रंगाच्या थार गाडीने दुचाकींना धडक दिली होती.
त्यामध्ये पाच दुचाकींचे नुकसान झाले. देशपांडे यांनी बाहेर जाऊन पाहिले असता ही थार होती. त्यांनी गाडीजवळ जाऊन पुजारी याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र त्याने तेथून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर देशपांडे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पुजारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.