पुणे: महापालिकेच्या पथ विभागाने शहरात केवळ ५४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केल्यानंतर त्यावर सजग नागरिक मंचने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. नवी पेठेतील विठ्ठल मंदिर ते गांजवे चौक या रस्त्यावरील अवघ्या ५० मीटरच्या पट्ट्यातच सुमारे २५ खड्डे असल्याचे निदर्शनास आणत मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वेलणकर यांनी, "नेमेचि येतो मग पावसाळा, रस्त्यांवर भरते खड्ड्यांची शाळा," अशी उपरोधिक टिप्पणी करीत शहरातील रस्त्यांच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले आहे. खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे रस्त्यांवर साचलेली खडी, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना शहरात केवळ ५४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा करणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली.
नवी पेठेतील विठ्ठल मंदिर ते गांजवे चौक या मार्गावरील अवघ्या ५० मीटरमध्येच २५ खड्डे असल्याचे सांगत, हे खड्डे पथ विभागाच्या नजरेतून सुटले आहेत की शहरातील एकूण ५४ खड्ड्यांपैकी हेच २५ खड्डे आहेत, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
महापालिका प्रशासनाने अशा अवास्तव आणि दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीवर नागरिकांनी विश्वास ठेवावा, ही अपेक्षाच हास्यास्पद असल्याचे नमूद करीत पुणेकरांची जीवघेणी थट्टा होत असल्याची टीका सजग नागरिक मंचने केली आहे.
महापालिका आयुक्तांनी स्वतः शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून वास्तव परिस्थितीची खातरजमा करावी तसेच चुकीचे आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही मंचने निवेदनाद्वारे केली आहे.