

टाकळी हाजी: डोंगरगण-शिवनगर (ता. शिरूर) परिसरातील एका शेतावर चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. २६) दुपारी घडली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
तुकाराम हेमा काळे (वय ३८, रा. शिनोली, ता. आंबेगाव) व त्याची पत्नी शीतल तुकाराम काळे (वय ३५) हे गेल्या पंधरा दिवसांपासून डोंगरगण येथील डॉ. हिरामण चोरे यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करत होते. आरोपी तुकाराम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शेतावरील मुकादम ओमकार बाळू भिंगे हे रविवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास गोठ्याकडे जात होते. त्यावेळी त्यांना एका खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता तुकाराम काळे हा खोलीचा दरवाजा आतून बंद करून पत्नी शीतल हिला लाकडी दांडक्याने डोक्यावर व मांडीवर बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. भिंगे यांनी आरोपीला मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'आत आला तर तुझाही खून करीन,' अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर ओमकार भिंगे यांनी शेतमालक डॉ. हिरामण चोरे यांना माहिती दिली. तसेच इतर कामगारांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आरोपीने खिडकीतून दगडफेक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माहिती मिळताच शिरूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर आरोपी बाहेर आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने रागाच्या भरात मारहाण करून खून केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी ओमकार भिंगे यांच्या फिर्यादीवरून तुकाराम काळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग पुढील तपास करीत आहेत.