पुणे: भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात सोमवारी (दि.8) सायंकाळी घडली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिजित गणेश रेवले (वय 19, रा. संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक सूर्यकांत दिगंबर श्रीरामे (वय 36) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजित याचे नातेवाईक रतन चंद्रभान कराळे (वय 42) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हा बारावी उत्तीर्ण झाला असून, तो नीट परीक्षेचा अभ्यास करत होता. सोमवारी (8 सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार अभिजित हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालय परिसरातून निघाला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीस्वार अभिजितला धडक दिली. अपघातात अभिजित गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.
पीएमपी बसच्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू
पीएमपी बसच्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रीती विद्यासागर वेंगल (वय 26, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणीचे नाव आहे. याबाबत सुजित संतोष भंडारी (वय 27, रा. मांजरी, हडपसर) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती वेंगल या खासगी कंपनीत कामाला होत्या. रविवारी (7 सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीच्या धडकेत त्यांचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.