

पुणे: महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी 16 गावांमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामांना आता गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत या कामांसाठी 323 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिकेकडे समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने ड्रेनेज, एसटीपी प्लांट आणि इतर कामांसाठी केंद्राकडून निधी मागविण्यात आला होता. त्यापैकी ड्रेनेज लाइनसाठीचा आराखडा केंद्राने मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच या गावांमध्ये ड्रेनेज लाईनचे काम सुरू होणार आहे. मात्र, सुमारे 190 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्पाचा आराखडा अद्याप शासनाकडे प्रलंबित असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. (Latest Pune News)
या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या खर्चात केंद्र आणि राज्य शासन प्रत्येकी 25 टक्के तर उर्वरित 50 टक्के खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. “आराखडा तयार असून, आतापर्यंत निधीअभावी निविदा काढता आली नव्हती. मात्र, मंजुरी मिळाल्याने आता प्रक्रिया वेगाने पार पडेल,” असेही पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले. समाविष्ट गावांपैकी म्हाळुंगे येथील टीपी स्कीममधील ड्रेनेजचे काम पीएमआरडीएमार्फत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांपैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची वगळता नऊ गावांमधील 68 टक्के, म्हणजेच 180 किलोमीटर ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे. लोणी येथील रिफायनरीलगतच्या भागातील कामासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून परवानगी मिळाली असून, उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
...या 16 गावांमध्ये होणार ड्रेनेज लाइनची कामे
सूस, महाळुंगे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नऱ्हे, जांभुळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, सणसनगर, किरकिटवाडी, नांदोशी, नांदेड, खडकवासला आणि पिसोळी.
निवडणुका रखडल्याने मिळाला नाही 15 व्या वित्त आयोगाचा निधी
शहरातील विविध प्रकल्पांसाठी महापालिकेने 15व्या वित्त आयोगाकडून निधीची मागणी केली होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने आयोगाकडून निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे काही प्रकल्प रखडले असल्याचेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले.