पुणे: शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी, नऱ्हे, बाणेर, मांजरीसह चौदा वाहतूक विभागांच्या परिसरातील ३८ ब्लॅक स्पॉटवर चालू वर्षातील आठ महिन्यांत तब्बल १८५ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात हे अवजड वाहनांमुळे झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही ठिकाणे निश्चित करून त्यावर तातडीने उपाय-योजना करण्यास पावले उचलली आहेत. पुणे महापालिकेशी समन्वय साधून त्यावर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बहुतांश अपघात हे जड वाहनांमुळे झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १४ वाहतूक विभागांच्या प्रमुखांची विशेष बैठक घेतली. संबंधित विभागांमधील अपघातप्रवण ठिकाणांची माहिती घेऊन त्याठिकाणी वाहतूक नियमन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच 'ब्लॅक स्पॉट'वर पोलिसांची विशेष नजर ठेवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे आणि आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तैनात करण्याचे नियोजन केले आहे. नंतर पुढील टप्पा यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून, प्रसंगी महापालिकेशी समन्वय साधून तेथील ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पुणे शहर आणि लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीबरोबर अपघातांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलिसांचे वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यानुसार, पुणे पोलिसांनी पुर्ण शहराची पाहणी केली. तसेच, सतत होणाऱ्या अपघातांची माहिती घेतली आहे. त्यानुसार, शहरातील ३४ विभागांपैकी केवळ १४ वाहतूक विभागांत सर्वाधिक अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी, नर्हे, बाणेर, मुंढवा, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, वाघोली आणि खराडी या १४ वाहतूक विभागांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील प्रमुख रस्ते, चौक, वळणे तसेच गर्दीच्या ठिकाणी अपघातांचा धोका अधिक असल्याने पोलिसांकडून आता विशेष नियोजन करण्यात येत आहे.
ट्रिपलसीट, फॅन्सी नंबरवर कारवाई वाढणार
शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रिपलसीट तसेच फॅन्सी नंबरप्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई पुढील काळात मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. ही मोहीम व्यापक प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
१४ विभागांवर विशेष वॉच
आंबेगाव, बिबवेवाडी, नर्हे, बाणेर, लक्ष्मीनगर, वानवडी, मुंढवा, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, फुरसुंगी, लोणीकंद, वाघोली आणि खराडी या अपघातांच्या १४ वाहतूक विभागांमध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
दंडात्मक कारवाईला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ई-चलान मशिन घेऊन रस्त्यावर उभा राहत दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या कारवाईला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ब्रेक लावला होता. पंधरा दिवसासाठी ही मुदत होती. मात्र, आता त्याची मुदत वाढवत ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस आयुक्तांनी जैसे थेच आदेश ठेवले असून, कर्मचाऱ्यांनी केवळ कोंडी फोडण्याचे काम करावे, असे आदेश दिले आहेत. पुणे पोलिस आयुक्तांनी कारवाईला ब्रेक लावत अंमलदारांची ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून त्यांना 'एनफोर्समेंट हॉलिडे' दिला होता. या काळात अंमलदारांनी प्रामुख्याने वाहतूक नियमन करावे लागणार आहे. ई-चलनाद्वारे कारवाईचे अधिकार पोलिस उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडे असणार आहेत.