पुणे : पुढारी वृत्तसेवा
मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पांचा चेंडू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात पोहचला आहे. 'या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे महापालिका समाधानकारक उत्तर देऊ शकलेली नाही. त्यामुळे याबाबत थेट मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहे,' अशी माहिती खा. अॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.
महापालिकेने मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, पर्यावरणवादी संघटनांनी या प्रकल्पावर अनेक आक्षेप उपस्थित केले आहेत. पर्यावरणवाद्यांच्या शंकांची महापालिकेने जी उत्तरे दिली आहेत, ती समाधानकारक नसल्याचा दावा अॅड. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. अॅड. चव्हाण म्हणाल्या, 'प्रकल्पाचे सादरीकरण करून जो अहवाल पालिकेने दिला आहे, त्यात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहे.
नदीकाठ सुधारणा प्रकल्पानिमित्ताने मुख्यमंत्री थेट आता पुण्यात लक्ष घालणार आहेत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गेल्या पावणेतीन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सर्व निर्णय घेत असून, मुख्यमंत्र्यांचा त्यास पाठिंबा राहिलेला आहे. मात्र, नदीकाठ प्रकल्पानिमित्त उपमुख्यमंत्र्यांना डावलून मुख्यमंत्री निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.