Helipad Pudhari
पुणे

Pune Ring Road Development: पुणे रिंग रोडवर हेलिपॅडची उभारणी; आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळणार

रिंग रोड आणि द्रुतगती मार्गावर मोठे अपग्रेड; प्रवाशांसाठी सुरक्षित आणि जलद सुविधा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे रिंग रोडने प्रवास करणाऱ्यांना गरज भासल्यास तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी पूर्व व पश्चिम मार्गावर प्रत्येकी तीन हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. तर, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी दोन हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत.

पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागातील मार्गाचे काम डिसेंबर 2027 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून, लागलीच तो वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

द्रुतगती मार्गावर वा रिंग रोडवर आपत्कालीन परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्स वा एअर लिफ्टची सुविधा पुरविणे शक्य नसले तरी विशिष्ट अंतरावर हेलिपॅड उभारून प्रवाशांना तातडीची वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

द्रुतगती मार्गाची होणार पुनर्बांधणी

भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन पुणे-मुंबई द्रूतगती मार्गाच्या पुनर्बांधणीचे आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी 14 हजार 499 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या द्रुतगती मार्गाचा वापर दररोज 80 हजार प्रवासी वाहने करतात. हा मार्ग आठपदरी झाल्यानंतर ही संख्या 1 लाख 10 हजार प्रवासी वाहनांपर्यंत वाढेल, तर दहा पदरी झाल्यावर त्याची क्षमता दररोज 1 लाख 65 हजार प्रवासी वाहनांपर्यंत वाढेल. या रुंदीकरणासाठी सध्या बोगद्यांजवळच आणखी सहा बोगदे तयार करावे लागणार आहेत.

कन्सेशन पिरियडमध्ये होणार दहा वर्षे वाढ

पुनर्बांधणी व रुंदीकरणाच्या खर्चवसुलीसाठी टोलवसुलीसाठीचा कन्सेशन कालावधीत दहा वर्षे वाढ करण्यात येणार आहे, असेही वसईकर यांनी सांगितले. सध्याचा कन्सेशन पिरियड 2035 पर्यंत असून, आता तो 2045 पर्यंत वाढणार आहे. सध्या या मार्गावर आयआरबीकडून टोलवसुली होते. 2030 पर्यंतचे टोलवसुलीचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले आहे.

  • द्रुतगती मार्गावर ताजेमध्ये 500 ट्रकचे, तर रिंग रोडवर शिवरेमध्ये एक हजार क्षमतेचे ट्रक टर्मिनल होणार

  • डिसेंबर 27 मध्ये 65 किलोमीटरचा रिंग रोड प्रवासासाठी खुला

  • रिंग रोड पूर्ततेनंतर मुंबई-सातारा प्रवास अडीच तासांत

  • द्रुतगती मार्गावरील खोपोली ते लोणावळादरम्यानच्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात

  • 1 मे ला खुली होणार मिसिंग लिंक

  • फक्त प्रवासी कार्सना वापरता येणार मिसिंग लिंक

  • अवजड वाहने व प्रवासी बसला सहा महिन्यांपर्यंत मिसिंग लिंकने प्रवास करण्यास मनाई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT