Assault Pudhari
पुणे

Pune Crime: पुण्यात रिअल इस्टेट व्यावसायिकाची आत्महत्या; पत्नी व सावत्र मुलांविरोधात गुन्हा

कौटुंबिक वाद आणि छळाच्या आरोपांनंतर टोकाचे पाऊल; सुसाईड नोटच्या आधारे पोलिस तपासाला वेग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कौटुंबिक कलह, पत्नी, सावत्र मुलांकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ आणि जादूटोणासारख्या अंधश्रद्धेच्या त्रासाला कंटाळून ५३ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. शुक्रवार पेठेतील मध्यवर्ती भागात ही घटना घडली.

राजीव मनोहर पायगुडे (वय ५३, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या रिअल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी राजीव यांच्या पत्नी मनीषा ऊर्फ मंगल पायगुडे, सावत्र मुलगी स्मृती आणि सावत्र मुलगा रोहित यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजीव यांचे मोठे भाऊ रवींद्र मनोहर पायगुडे (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

राजीव पायगुडे यांचा २०२० नंतर मनीषा ऊर्फ मंगल हिच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. मनीषाला तिच्या पहिल्या विवाहातून झालेली स्मृती आणि रोहित ही दोन मुले होती. लग्नानंतर हे सर्वजण शुक्रवार पेठेतील सर्व्हे नंबर ५४८, ब येथील राहत्या घरात एकत्र राहत होते. लग्न झाले तेव्हा सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, काही काळानंतर घरात कौटुंबिक वादाची ठिणगी पडली. पत्नी आणि तिची मुले राजीव यांना मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागली.

राजीव आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत वाद सुरू होते. २० एप्रिल २०२६ रोजी राजीव यांनी आपले मोठे भाऊ रवींद्र यांना फोन केला होता. त्यांनी वैतागलेल्या अवस्थेत पत्नी आणि सावत्र मुले छळ करीत असल्याची व्यथा मांडली होती. तसेच, ते सतत पैशांची मागणी करीत असून, मारहाण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. राजीव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चारपानी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांना झालेल्या त्रासाचा पाढा वाचला.

"पत्नी मनीषा, स्मृती आणि रोहित हे त्यांना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते. मनीषा माझ्यावर जादूटोणा करीत असल्‍याचे त्‍यात म्‍हटले आहे. मला पैशांसाठी छळले जात असून, आता मला जगण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही," अशी चिठ्ठी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिली होती. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयसिंग दाढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT