पुणे: कॅब भाड्याच्या दरावरून झालेल्या वादातून रॅपिडो कॅबचालकास सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर येथे घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी धवल रावले, सरस्वती रावले, वैष्णवी, यशवंत चळवादी, सुषमा चळवादी व मनीषा चळवादी (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला दाखल केला आहे. श्रीकृष्ण मधुकर लाड (वय 30, रा. यशराज कॉम्प्लेक्स, लोणी काळभोर) असे जखमी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर कदमवाकवस्ती येथील जगदंब हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी रात्री पावणेदहा वाजता साई सृष्टी अपार्टमेंटसमोर ही घटना घडली. फिर्यादी लाड यांना रॅपिडोवरून पिकअप बुकिंग मिळाल्याने ते तेथे पोहोचले. काही वेळाने धवल रावले याच्यासह चार महिला वाहनात बसल्या. चार प्रवासी नेण्यास परवानगी नसल्याचे लाड यांनी सांगितले.
तसेच सीएनजी दरवाढीमुळे कंपनीने ठरविलेल्या भाड्यात गाडी चालविणे परवडत नसल्याने 25 रुपये प्रतिकिमी दराने जाण्याची अट त्यांनी घातली. यावरून प्रवाशांनी संताप व्यक्त करत वाद घातला व बुकिंग रद्द केले. त्यानंतर काही वेळातच आरोपी पुन्हा घटनास्थळी येऊन लाड यांना शिवीगाळ करत कारमधून बाहेर ओढले.
त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका आरोपीने दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. तसेच कान, पोट, पाठ व पायांवरही प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात लाड गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून लाड यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणा चा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.