Top startup cities India
आशिष देशमुख
पुणे: स्टार्टअप उभारणीत पुणे शहराचा क्रमांक देशात पाचव्या स्थानी आहे. पुण्यात सरकारच्या नोंदणीत पाचशे स्टार्टअप असले, तरी नोंदणी नसलेले सुमारे 1 हजार 400 स्टार्टअप आहेत. यात सैन्यदलासाठीच्या स्टार्टअपची संख्या जास्त म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. प्रदूषणविरहित जेट विमानाचे इंजिन तयार करण्याचा मान पुण्यातील एका स्टार्टअपने नुकताच मिळविला आहे.
देशात 2016 मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. याला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली असून, देशात आजघडीला 1 लाख 59 हजार स्टार्टअपची संख्या झाली आहे. यात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर असून, संरक्षणाशी संबंधित स्टार्टअप पुणे शहरात वेगाने विकसित झाले आहेत. जेट विमानांना लागणारे प्रदूषणविरहित इंजिन तयार करणारे स्टार्टअप देशात प्रथम पिंपरी-चिंचवड भागात तयार झाले. (Latest Pune News)
केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाने 15 जानेवारी 2025 पर्यंत देशात 1 लाख 59 लाखांहून अधिक स्टार्टअपना मान्यता दिल्याने भारताने जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम म्हणून जगात नाव मिळविले आहे. शंभरांहून अधिक युनिकॉर्नचा यात समावेश आहे. पुणे शहरासह बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख केंद्रांनी या परिवर्तनाचे नेतृत्व केले आहे, तर लहान शहरांनी देशाच्या उद्योजकीय गतीमध्ये वाढत्या प्रमाणात योगदान दिले आहे.
फिनटेक, एडटेक, हेल्थटेक आणि ई-कॉमर्समधील स्टार्टअपनी स्थानिक आव्हानांना तोंड दिले आहे आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आहे. झोमॅटो, न्याका आणि ओलासारख्या कंपन्या भारतातील नोकरी शोधणार्यापासून नोकरी देणार्यापर्यंतच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहेत, ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळत आहे, असा अहवाल केंद्र शासनाने दिला आहे.
आयसर, सीओईपीच्या स्टार्टअपची प्रगती...
शहरातील राष्ट्रीय विज्ञान संस्था (आयसर) आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे सुरूकरण्यात आलेले भाऊ स्टार्टअप या ठिकाणी तरुण विद्यार्थ्यांनी सुरू केलेले छोटे स्टार्टअपने कोरोना काळात खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या ठिकाणच्या एका स्टार्टअपने युरोपातील काही देशांसाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष अॅप विकसित केले आहे. आयसरमध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने मायक्रो बॅटरीसह ट्रक, बसला लागणार्या मोठ्या सोडियम बॅटरी तयार केल्या तसेच मायक्रो बॅटरीचे स्टार्टअप या ठिकाणी आहे.
जेट विमानाचे इंजिन करणारे स्टार्टअप...
भारतातील पहिल्या प्रदूषणमुक्त जेट विमानाचे इंजिन तयार करणारे स्टार्टअप पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड भागात या वर्षात स्थापन झाले. अभिजित इनामदार यांनी हैदराबादच्या 23 वर्षांच्या तरुणाला सोबत घेत ही कामगिरी केली. त्यांनी नॉर्वे या देशातून पुण्यात येत हे संपूर्ण भारतीय बनावटीचे प्रदूषणमुक्त जेट इंजिन तयार केले. 2027 पर्यंत पुण्यातूनच देशातील पहिले प्रदूषणमुक्त जेट विमानासाठी लागणारे इंजिन तयार करण्याचे त्यांनी लक्ष्य हाती घेतले आहे.
स्टार्टअप इंडियाचे प्रमुख टप्पे...
मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या 2016 मध्ये 500 होती
15 जानेवारी 2025 पर्यंत देशात 1 लाख 59 हजार 157 संख्या
73 हजार 151 मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे, जे भारतातील महिला उद्योजकांच्या वाढीचे प्रतिबिंब आहे.
2016 ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मान्यताप्राप्त स्टार्टअपनी 16 लाख 60 हजारांहून अधिक लोकांना थेट नोकर्या दिल्या.
या आहेत योजना...
स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना
स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी योजना
स्टार्टअपसाठी निधी योजना