Pune Rains
शिरूर- भीमाशंकर मार्गावर शिरगांव येथील नेकलेस धबधब्याजवळ डोंगराचा काही भाग कोसळला आहे. Pudhari photo
पुणे

Pune Rains | शिरूर- भीमाशंकर मार्गावर शिरगांव येथे दरड कोसळली

पुढारी वृत्तसेवा

वाडा (जि. पुणे)

खेड तालुक्यातील दळणवळणच्यादृष्ट्या मुख्य मानला जाणारा शिरूर- भीमाशंकर राज्य मार्गावर शिरगांव येथील नेकलेस धबधब्याजवळ डोंगराचा काही भाग कोसळला आहे. यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात दमदार पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाचा जोर सुरूच असून बुधवारी रात्री अथवा गुरूवारी पहाटेच्या दरम्यान शिरूर- भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली.

वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा

डोंगराचा भाग कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर माती, दगड तसेच मोठी झाडे, विद्यूत खांब रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच रस्ता पुर्णपणे निसरडा झाला आहे. हा रस्ता वर्दळीचा असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.

३ जनावरांना वाचवले

शेतकरी अशोक लांघी यांचा रस्त्यालगत जनावरांचा गोठा असून यात ३ जनावरे होती. ही जनावरे ढिगाऱ्याजवळ अडकली होती; मात्र सुदैवाने अशोक यांनी त्यांची जनावरे या ढिगाऱ्यातून ओढून बाहेर काढल्याने मोठी हानी टळली.

रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु

या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी स्वप्नील शिर्के यांनी दिली. रस्ता बंदचा फटाका चाकरमानी तसेच दुग्ध व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. गतवर्षी याच ठिकाणी दरड कोसळी होती. परंतु प्रशासनाच्यावतीने तात्काळ उपाययोजना करून मार्ग तातपुरत्या स्वरुपात उपाययोजना करुन सुरळीत करण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात वारंवार असा प्रकार घडत असून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले असून युद्ध पातळीवर काम करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे राम जाधव यांनी दिली.

SCROLL FOR NEXT