Dairy Farmers Subsidy Pudhari
पुणे

Pune Dairy Farmers Subsidy: पुणे जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडली; पशुपालकांसाठी ७५% अनुदानावर आधुनिक साहित्य योजना

जुलैअखेर १७९.९% पावसाची नोंद; मावळ व खेड आघाडीवर, तर ४४४ पशुपालकांना जिल्हा परिषदेकडून आधुनिक साधनसामग्रीचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यात यंदा जुलैअखेर पावसाने सरासरी ओलांडली असून, ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या १७९.९ टक्के पावसाची नोंद झाली. या कालावधीतील जिल्ह्याचा सरासरी पाऊस ३०९.३ मिलीमीटर असताना प्रत्यक्षात ५५६.३ मि.मी. पाऊस पडला आहे. प्रत्यक्ष पावसाच्या प्रमाणात मावळ तालुका आघाडीवर आहे; मात्र, सरासरीच्या तुलनेतील टक्केवारीत खेड तालुक्यात सर्वाधिक ३९०.९ टक्के पाऊस नोंदला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८०.३ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ३५८.९ टक्के पाऊस नोंदवण्यात आला. मावळमध्ये एकूण २५ पावसाचे दिवस नोंदले गेले. पावसाच्या टक्केवारीत खेड तालुका आघाडीवर असून, तालुक्याची सरासरी १६५.६ मि.मी. असून, तेथे २२ पावसाच्या दिवसांत सरासरीच्या ३९०.९ टक्के अर्थात ६७४.४ मि.मी. पाऊस झाला आहे.

पुणे शहरात १७ दिवस पाऊस पडला असून, तो सरासरीच्या (१८४ मिमी) २४९.६ टक्के आहे. जिल्ह्यात तुलनेने सर्वात कमी पाऊस इंदापूर तालुक्यात झाला. मात्र, इंदापुरातही आठ पावसाच्या दिवसांत ८४.५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या १०४.१ टक्के पाऊस नोंदला गेला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाने संबंधित कालावधीची सरासरी ओलांडली.

मुळशी, मावळ, वेल्हे आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी सर्वाधिक २५ पावसाचे दिवस नोंदले गेले. भोरमध्ये २३, खेडमध्ये २२, जुन्नरमध्ये २०, तर हवेलीमध्ये १९ पावसाचे दिवस होते. सर्वात कमी सात पावसाचे दिवस बारामतीत नोंदविण्यात आले. इंदापूरमध्ये ८, दौंडमध्ये ९ आणि शिरूरमध्ये १० पावसाचे दिवस होते.

७५ टक्के अनुदानावर आधुनिक साहित्य

पुणे जिल्ह्यातील पशुपालकांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देत दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ७५ टक्के अनुदानावर उपयुक्त साहित्य पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून या योजनेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली असून, जिल्ह्यातील सुमारे ४४४ पशुपालकांना त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात ११ लाख ४४ हजार ८९३ गायी-म्हशींचे पशुधन असून, ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. लहान आणि मध्यम पशुपालकांना आधुनिक साधने उपलब्ध करून त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT