Rain Pudhari
पुणे

Pune Rainfall 2026: देश दुष्काळाच्या सावटात, पण पुणेकर भाग्यवान! जुलैच्या २४९ टक्के पावसाने धरणे भरली

जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पाऊस; पश्चिम घाटाच्या प्रभावामुळे पुण्याला पावसाची साथ, आंबेगावात सर्वाधिक ४८७ टक्के पाऊस

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: अल-निनोच्या प्रभावाने संपूर्ण देश दुष्काळाच्या सावटाखाली असताना पुणे शहरावर मात्र पाऊस मेहरबान आहे. जून, ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरमध्येही कमी पाऊस असताना केवळ जुलैत झालेल्या २४९ टक्के पावसाने पुण्यातील सर्व धरणे भरली. त्यामुळे अवघ्या राज्यात अन् देशात पुणेकर भाग्यवान ठरले आहेत.

यंदा अल-निनोचा प्रभाव असल्याने अवघा देश दुष्काळाच्या छायेत आहे. तसेच, महाराष्ट्रातील ३६ पैकी सुमारे ३२ जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. केवळ पुणे, सातारा नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांतच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यातही पुणे शहरात जुलैमध्ये झालेल्या पावसाने सर्व धरणे भरल्याने पुणेकरांची पाणीकपातीपासून सुटका झाली.

पुणेकर का भाग्यवान? या जिल्ह्यांची स्थिती पाहा...

महाराष्ट्रातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत बहुतांशवेळा पाणीटंचाई असते. जालना शहरात तर महिन्यातून एकदा, छत्रपती संभाजीनगर शहरात आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते तर बीड, लातूर, धाराशिव येथील विहिरींचे तळ खोल गेल्याने तेथे विहिरींवर पाणी भरण्यासाठी झुंबड उडते, अशी स्थिती आहे. राज्यात पुणे शहर एकमेव शहर ठरले आहे, जेथे २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. यंदाही पाणीकपातीची वेळ आली नाही अशावेळी पुणेकर किती भाग्यवान आहेत! असे वर्णन दुष्काळी भागातील नागरिक पुण्याचे करीत आहेत.

पुणे शहरातील स्थिती...

  • जूनमध्ये केवळ ४०.४ टक्के पाऊस

  • जुलैमध्ये तब्बल २४९ टक्के

  • ऑगस्टमध्ये ५२.६ टक्के

  • ८ सप्टेंबरपर्यंत १७ टक्के

१ जून ते ८ सप्टेंबर २०२६ एकूण पाऊस

  • शिवाजीनगर: ६८२. २ मि.मी.

  • पाषाणः ७२३.३ मि.मी.

  • लोहगावः ९२० मि.मी.

पुणे शहर महिनावार पाऊस...

  • जून २०२६------१५२.९------६१.७------४०.४ टक्‍के

  • जुलै २०२६------१८४------ ५०८.५-----२४९.६ टक्‍के

  • ऑगस्ट २०२६----१३५.१-----७१-------५२.६ टक्‍के

  • ५ सप्टेंबरपर्यंत-----२२.३-----३.८------१७ टक्‍के

देशातील स्थिती...

  • एकूण ३९ टक्के भूभाग दुष्काळी स्थितीत

  • देशातील एकूण ७४१ पैकी ३९७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस (४७ ते ५३ टक्के)

महाराष्ट्रातील स्थिती....

  • ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत कमी पाऊस

  • १८ जिल्हे रेड झोनमध्ये

  • १४ जिल्ह्यात जेमतेम पाऊस

  • फक्त चार जिल्ह्यांत मुसळधारेची नोंद (पुणे, सातारा, नाशिक, पालघर)

शहरात झालेला पाऊस (१ जून ते ५ सप्टेंबर २०२६) (पाऊस मिमी)

पुणे शहर ----- ४९४.३ -------- ५९५.८ ------ १२०.५

केशवनगर ----- ४९४.३ ------- ५९४.२ ------१२०.२

कोथरूड ------- ५८१ --------- ८५६.७ ----१४७.५

खडकवासला ----- ५८१ ------- ६१३.८ -----१०५.६

चिंचवड --------- ५८१ -------- १००२.४ ----१७२.५

हडपसर --------५८१ -------४१७.३ -------७१.८

वाघोली ------- ५८१ ----- २६१ ---- ४५ टक्के ( सर्वात कमी )

आंबेगाव ------ ५६७.२ ------ २७६६ ---- ४८७ टक्‍के (सर्वाधिक)

इतका पाऊस कसा झाला?

पश्चिम घाटाचा ऑरोग्राफिक प्रभाव हे प्रमुख कारण आहे; म्हणजे अरबी समुद्रातून येणारे दमट वारे पश्चिम घाटाला धडकल्यावर वर चढतात. यामुळे घाटमाथा भागावर पावसाचे ढग अधिक सक्रिय होतात. त्यामुळे मुळशी, ताम्हिणी, मावळ या भागात जास्त पाऊस होतो. त्याचा फायदा शहराला होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT