पुणे: पुढील वर्षात पुणे रेल्वे स्टेशनचा पूर्णपणे कायापालट होणार असून, यासाठी तब्बल 400 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाचा मास्टर प्लॅनदेखील तयार करण्यात आला असून, तो अंतिम टप्प्यात आहे, असे रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी शुक्रवारी (दि. 03) रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढील वर्षभरात पुणे रेल्वे स्टेशन एका आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या टर्मिनलच्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे स्टेशनचा पुनर्विकास आणि यार्ड रिमॉडलिंगअंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे बदल प्रस्तावित आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.
खडकी आणि हडपसर टर्मिनल ठरणार नवे सपोर्ट टर्मिनल
पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. खडकी रेल्वे स्टेशनच्या विकासकामांसाठी 70 कोटींचा निधी मंजूर केला असून, पुणे स्थानकावरील काही गाड्या येथे स्थलांतरित केल्या जातील. तसेच, ’अमृत भारत योजने’अंतर्गत हडपसरचा विकास करण्यात आला आहे. येथील नवीन फूट ओव्हर बिज आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 चे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
रेल्वेची वर्षभरात मोठी कारवाई
गुन्हेगारीवर वचक - 125 गुन्हेगारांना अटक, तर महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या 3,452 अनधिकृत प्रवाशांवर कारवाई. अवैध विक्रेते, फेरीवाले - 7,763 केसेस दाखल करून 68 लाख रुपयांचा दंड वसूल. ’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत 412 मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित घरी पोहोचवले. ‘अमानत सेवा’अंतर्गत 260 प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवून दिले.
नव्या पुनर्विकसित स्थानकात काय असणार?
सहा नवे प्लॅटफॉर्म-वाढती गर्दी आणि गाड्यांची संख्या लक्षात घेता, सहा नवीन प्लॅटफॉर्मची भर टाकली जाणार आहे.
नवे एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स-स्टेशनवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग स्वतंत्र आणि अधिक प्रशस्त केले जातील.
अद्ययावत सुविधा : सर्व प्लॅटफॉर्मवर आधुनिक लिफ्ट, एस्केलेटर, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात-स्टेशन पुनर्विकासाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षभरात ही पुनर्विकासाची सर्व कामे पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
आम्ही पुणे रेल्वेस्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. 400 कोटींच्या कामांद्वारे प्रवाशांना पुणे रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सुविधा देण्याचा आमचा मानस आहे, तसेच, खडकी आणि हडपसर टर्मिनल्समुळे पुण्याच्या रेल्वे वाहतुकीला नवी गती मिळेल.राजेश कुमार वर्मा, डीआरएम, रेल्वे, पुणे विभाग