पुणे : दिवाळी हा सण म्हणजे घराकडे जाण्याची ओढ. लक्ष्मीपूजनाच्या अगदी पूर्वसंध्येला पुणे रेल्वे स्थानकावर हीच ओढ घेऊन गावी जाणाऱ्यांची तुफान गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. पुणे स्टेशनचे प्रत्येक प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षा कक्ष प्रवाशांनी भरलेले होते, जणू माणसांचा महासागरच..! हजारो चाकरमानी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात आपला दिवाळीचा प्रवास सुरू करण्यासाठी रेल्वेची वाट पाहत होते, असे चित्र सोमवारी (दि. 20) पाहायला मिळाले.(Latest Pune News)
पुणे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत रेल्वे प्रशासनाचा सोमवारी चोख बंदोबस्त दिसून आला. रेल्वे सुरक्षा बल, तिकीटतपासनीस आणि रेल्वे अधिकारी दिवस-रात्र काम करताना दिसत होते. प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी कडक नियोजन केले होते.
याबाबत विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहेरा म्हणाले, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पार्सल विभागाजवळ विशेष कंट्रोल रूम स्थापन केले आहे. या कंट्रोल रूमला तीन शिफ्टमध्ये बसून अधिकारी पुणे रेल्वे स्थानकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात कामकाज करीत आहेत. तसेच, याशिवाय आमच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सातत्याने राउंड घेत, येथे कडक पाहणी करीत आहेत.
या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी स्वतः लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पुणे रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी गर्दीतील प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची स्थानकवरच कंट्रोल रूमला तातडीची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. वर्मा यांनी अधिकाऱ्यांनी प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना दिल्या. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश देत विशेष काळजी घेण्यास सांगितले. दरम्यान, त्यांनी प्रवाशांसाठी उभारलेल्या मंडपामध्ये प्रवाशांशी संवाद देखील साधला.
हिंदु संस्कृतीतील महत्त्वाचा असलेला दिवाळसण आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करण्याच्या इच्छेने चाकरमानी मंडळी गावी जाण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. या प्रवाशांमुळे रेल्वेस्टेशनवर सोमवारी ‘महागर्दी’चा अनुभव आला. (छाया ः अनंत टोले)
दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता यावा, यासाठी आम्ही विशेष गाड्या सोडल्या आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विशेष गाड्या आणि स्टेशनवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. सुरक्षेसाठी आरपीएफ आणि रेल्वे पोलिस खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहोत.राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग