पुणे: दिवाळी व छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वेस्थानकांवर होणारी अलोट गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी चेंगरा-चेंगरीची शक्यता टळावी, यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मंडप उभारला आहे, यात पायाभूत सुविधा, गाड्यांची माहिती देणारे फलक, अतिरिक्त कर्मचारी आणि कडक रेल्वे पोलिस (आरपीएफ) बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पुणे रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरील वाढता ताण कमी करण्यासाठी यंदा रेल्वेस्थानक परिसरात (पार्सल विभागशेजारी) प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. मागील काही वर्षापूर्वी पुणे रेल्वेस्थानकावर चेंगरा-चेंगरीची घटना घडली होती. अशी घटना होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून हे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे रेल्वेस्थानकावर स्वतंत्र नोडल अधिकारी आणि अतिरिक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे पोलिस (आरपीएफ) प्रवाशांच्या सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या मंडपात पुरेशा प्रमाणात लाइट आणि फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, अतिरिक्त सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांच्या आगमनाची आणि प्रस्थानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी माहिती दर्शक फलक लावण्यात आले आहेत.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली असून, प्रवाशांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी विशेष प्रसाधनगृहांची व्यवस्था या मंडपात करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर एकदम गर्दी न करता या स्वतंत्र मंडपाचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रवाशांची सुरक्षा, सोय आणि प्लॅटफॉर्मवरील चेंगरा-चेंगरी टळावी, यासाठी पुणे रेल्वे विभागाने यंदा हे नियोजन केले आहे. मुख्य प्लॅटफॉर्मवरील ताण कमी करण्यासाठी आम्ही पुणे स्थानक परिसरातच पार्सल विभागाशेजारी एका स्वतंत्र मंडपाची विशेष व्यवस्था उभी केली आहे. या मंडपात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी लाइट, फॅन, पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दिवाळी विशेष ट्रेनच्या वेळांची अचूक माहिती मिळण्यासाठी माहिती दर्शक फलक आणि मार्गदर्शनासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग