पुणे: दिवाळी आणि छठ पूजा सणाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या पुणे विभागाने एकूण 1,052 विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी 442 फेऱ्या भाऊबीजेच्या दिवसापर्यंत पार पडल्या. उर्वरित फेऱ्या डिसेंबरअखेरपर्यंत होतील. 442 फेऱ्यांद्वारे सहा लाख 69 हजार प्रवाशांनी प्रवास केला. (Latest Pune News)
दरवर्षी दिवाळी छठ पूजेच्या निमित्ताने रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष नियोजन केले जाते. त्यासंदर्भातील ही माहिती पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेशकुमार वर्मा यांनी गुरुवारी (दि.23) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा उपस्थित होते.
राजेश कुमार वर्मा म्हणाले, पुणे विभागातून दिवाळी आणि छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर 1052 अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे नियोजन आम्ही केले आहे. त्याद्वारे सुमारे 15 लाख 23 हजारांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानी सुरक्षितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. यापैकी 442 फेऱ्या आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि त्याद्वारे सहा लाख 69 हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. पुढील तीन दिवसांत प्रवाशांची सर्वाधिक सोय सुनिश्चित करण्यासाठी दररोज 10 गाड्या चालवल्या जातील आणि एकूण 34 गाड्यांची वाहतूक होईल. यामध्ये पुणे ते दानापूर, पुणे ते हरंगुळ आणि दौंड ते अजमेर यासारख्या टीओडी विशेष गाड्यांचा समावेश आहे.
आम्ही गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे स्टेशनवर आता 21,500 चौरस फुटांचा होल्डिंग एरिया (थांबण्याची जागा) तयार केला आहे, जिथे एकाच वेळी 3,500 प्रवासी थांबू शकतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बिहारकडे जाणाऱ्या सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या केल्या जात आहेत. कारण, हा प्लॅटफॉर्म होल्डिंग एरियाशी जोडलेला आहे. दि. 23 ऑक्टोबर ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीत आम्ही प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे स्टेशनवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आरपीएफ, एमएसएफ आणि होमगार्डचे 209 जवान तसेच 30 टीसी कर्मचारी दिवसभर कार्यरत आहेत. प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे, ही विनंती आहे.राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग