पुणे : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यात भूसंपादन होत असून, आतापर्यंत 95 टक्के शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संमती दिली आहे. शुक्रवारपासून (दि. 26) प्रत्यक्ष जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 50 हेक्टर जमिनीची मोजणी शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.(Latest Pune News)
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. 3 हजार 220 जणांनी 2 हजार 810 एकर जमिनीला संमती दिली होती. शुक्रवारी जमीन मोजणीसाठी पाच पथके तयार करण्यात आली होती.
महसूल विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन आणि इतर शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते. खानवडी, मुंजवडी, एखतपूर येथील 50 हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आली. तसेच फळझाडे, शेतविहीर, पाईपलाईन आदींचे मूल्यांकन करण्यात येत आहे. पुढील 25 दिवस जमीन मोजणीचे काम
सुरू राहणार आहे. स्थानिक शेतकरी तसेच बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहावे. त्यांच्या जमिनीत असणाऱ्या फळझाडांसह मालमत्तेची माहिती द्यावी, जेणेकरून अचूकता आणि पारदर्शकता राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तिन्ही गावांतील मोजणी शांततेत
यापूर्वी जमिनीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्या वेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जमिनीच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी तिन्ही गावांतील मोजणी अत्यंत शांततेत पार पडल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोजणीला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. जमिनीच्या मोजणीसाठी 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यासाठी पुढील 25 दिवसांची गरज लागणार आहे. पुढील काळात मोजणीसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी