पुणे: ‘आपला बाप्पा यंदा आपणच घडवायचा आणि तोही पर्यावरणपूरक!’ या विचाराने विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून श्री गणेशाच्या मूर्ती साकारत गणेशोत्सवाची तयारी सुरू केली. स्वतःच्या हातांनी घडविलेली मूर्ती घरी नेऊन त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला. आपल्या हातून साकारलेला गणराया पाहून त्यांच्या चेहर्यावर आनंदही फुलला. निमित्त होते ‘माझा बाप्पा-२०२६’ या उपक्रमांतर्गत सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये आयोजित केलेल्या शाडूच्या मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्याच्या कार्यशाळेचे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत मूर्ती साकारण्याचे धडे घेत आपल्या कल्पकतेला आकार दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना त्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
‘पुढारी’ माध्यम समूह, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित ‘माझा बाप्पा २०२६’ उपक्रमाअंतर्गत राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी बुधवारी कार्यशाळा आयोजित केली होती. नगरसेवक महेश वाबळे, नगरसेविका सई थोपटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश घोष, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे मुख्याध्यापक जांबुवंत मसलकर आदी यावेळी उपस्थित होते. सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. शाळेत झालेल्या कार्यशाळेत गणेशभक्ती, कलागुणांना वाव आणि पर्यावरणपूरक उत्सवाचा संस्कार असा तिहेरी संगम पाहायला मिळाला.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये श्री गणेशमूर्ती साकारण्यासाठीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. शालेय वयातच पर्यावरणाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजली, तर भविष्यात पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणारी पिढी घडू शकते. याच उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीला आकार देत आपल्या कल्पनेतील गणरायाचे रूप साकारले. केवळ मूर्ती घडविण्यापुरती कार्यशाळा मर्यादित न ठेवता, त्यामागील पर्यावरणपूरक विचारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. त्याचबरोबर पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे उद्भवू शकणारे जलप्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व आणि सण-उत्सव पर्यावरणाला पूरक पद्धतीने साजरे करण्याची गरज यावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शाडूच्या मातीपासून मुलांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पालकांनी घरी करावी, असे आवाहन पालकांना करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या आरुष चौरे, आर्यन पवार, यशश्री खरात, विघ्नेश मिसाळ आणि ओम परदेशी यांनी स्वतःच्या हातांनी बाप्पा घडविण्याचा आनंद वेगळाच होता, असे सांगितले.
पर्यावरणसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सण-उत्सवांमध्ये हाच विचार जपणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले तर ते दरवर्षी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती साकारतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि पालकांनीही मुलांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. जेणेकरून मुलांच्या कलेला वाव मिळण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचारही प्रत्यक्ष कृतीतून जपला जाईल.महेश वाबळे, नगरसेवक
गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात उत्साह आणि आनंद संचारणार आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ माध्यम समूहाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला शाडूच्या मातीपासून श्री गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाचा संस्कार हा मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजविणे आवश्यक आहे.सई थोपटे, नगरसेविका
निसर्गाचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून शाडूच्या मातीच्या मूर्तींचा वापर अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे. शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून निर्माण झाली पाहिजे.शैलजा भोसले, नगरसेविका
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढारी माध्यम समूहाने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य आहे. जोडीला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार दिला जात आहे, तेही खूप गरजेचे आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होईल, निसर्गाची जपवणूक होईल आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. शालेय विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीतून श्री गणेशमूर्ती घडविली, हे पाहून आनंद झाला.जांबुवंत मसलकर, मुख्याध्यापक, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल (सहकारनगर)
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा सण आहे; मात्र, त्यासोबत पर्यावरणाची काळजी घेणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच शाडूमातीच्या मूर्तीचे महत्त्व समजले, तर भविष्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अधिक व्यापक होईल.गणेश घोष, सामाजिक कार्यकर्ते