Dowry Harassment Pudhari
पुणे

PSI Dowry Harassment Case: पीएसआय पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; सर्व्हिस पिस्तूल दाखवून धमकावल्याची तक्रार

फ्लॅट आणि चारचाकीच्या मागणीवरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप; पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना झालेली ओळख, त्यानंतर प्रेमसंबंध आणि विवाह; मात्र लग्नानंतर हुंडा, फ्लॅट आणि चारचाकी गाडीच्या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पतीने सर्व्हिस वेपन (पिस्तूल) दाखवून धमकावल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या नातेवाइकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धनकवडी येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती राहुल शेषराव राठोड (वय २९, रा. जयराम तांडा, पाचेगाव सर्कल, ता. गेवराई, जि. बीड) आणि राजू पवार (वय ४०, रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि राहुल राठोड यांची २०२२-२३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती होती. त्याच्या अभ्यासाचा खर्च, वैद्यकीय उपचार आणि इतर कारणांसाठी फिर्यादीने दोन लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी राहुलची पीएसआयपदी निवड झाल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाला. नातेवाइकांच्या सांगण्यावरून त्याने आपल्याशी अंतर ठेवून अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. राहुलने लग्नास नकार दिल्यानंतर फिर्यादीने स्वारगेट येथील सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच, त्यांनी भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये दोन्ही बाजूंच्या संमतीने आळंदी येथे विवाह झाला. विवाहानंतर राहुल प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेला. मात्र, प्रशिक्षणादरम्यान आणि त्यानंतरही त्याने पत्नीला सासरी नेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

लग्नानंतर चारचाकी गाडी आणण्यासाठी पती व नातेवाइकांकडून तगादा लावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मागण्या पूर्ण न झाल्याने राहुलने अपमानास्पद बोलून घरखर्च देण्यासही नकार दिल्याचा आरोप आहे. सततच्या छळामुळे दोन ते तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. शिवीगाळ करून पिस्तूल दाखवत धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकारानंतर विवाहितेने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता आणि हुंडाबंदी अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेश खांदवे पुढील तपास करीत आहेत.

पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक असलेल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राठोड असे त्याचे नाव आहे. मागील चार महिन्यांपासून त्याची नेमणूक सहकारगर पोलिस ठाण्यात आहे. पुढील तपास सुरू आहे.
विठ्ठल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT