

पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, डासांची उत्पत्ती रोखण्यात हलगर्जी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर आता महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. बांधकामांच्या ठिकाणी साचणारे पाणी डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनत असल्याने ६००हून अधिक बांधकाम आस्थापनांची यादी बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये शहरात डेंग्यूचे ६६२ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३ हजार ३४८ दूषित कंटेनर आढळले आहेत. या प्रकरणी ४०२ नोटिसा बजावून १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने सप्टेंबरमध्ये २ लाख २६ हजार ७०५ घरे आणि मिळकतींची तपासणी केली. यामध्ये ३ लाख ९८ हजार ९३० कंटेनर तपासण्यात आले. त्यापैकी ३ हजार ३४८ कंटेनर दूषित, तर २ हजार ४१२ घरांमध्ये डासांच्या उत्पत्तीस पोषक परिस्थिती आढळली. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ५९९ दूषित घरे आणि ७२४ दूषित कंटेनर आढळले. कोंढवा-येवलेवाडीत ४१७, तर कोथरूडमध्ये ३९५ दूषित कंटेनरची नोंद झाली.
बांधकामस्थळांची तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
शहरातील कोथरूड, नगर रस्ता आणि औंध-बाणेर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. स्लॅबच्या क्युरिंगसाठी साठवलेले पाणी तसेच बांधकाम परिसरात साचणारे पाणी डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे. सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे यांनी कोथरूड परिसरात विविध ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे सांगितले.
त्यामुळे संबंधित भागांत तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त पावनीत कौर यांनी विभागांची समन्वय बैठक घेऊन डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. बांधकामस्थळी डासांची उत्पत्ती आढळल्यास प्रथम नोटीस दिली जाते. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास डासांची उत्पत्ती नष्ट करून शुल्क आकारले जाते. शुल्क भरण्यास नकार देणाऱ्या आस्थापनांवर बांधकाम विभागामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे.
तीन महिन्यांत रुग्णसंख्येत मोठी वाढ
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये डेंग्यूचे १०३, जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ५१२, तर सप्टेंबरमध्ये ६६२ रुग्ण आढळले. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये २७ हजार ७५९ घरांत धूरफवारणी, तर ५३ हजार २१२ घरांत औषधफवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनीही टेरेसवरील जुने टायर, रिकामी भांडी, कुलर, फ्रिज आणि वातानुकूलन यंत्रणांमध्ये पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.