Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Property Tax Complaints: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने दोन महिन्यांत ९३ टक्के तक्रारी निकाली काढल्या

७ हजार ८०५ तक्रारी प्राप्त; एसआयआर आणि जनगणनेच्या कामामुळे मनुष्यबळावर मर्यादा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मिळकतकराच्या तक्रारींचा डोंगर, त्यात एसआयआर आणि जनगणनेच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अशा दुहेरी आव्हानांचा सामना करताना पुणे महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने दोन महिन्यांत तब्बल ७ हजार ८०५ तक्रारींपैकी ९३ टक्के तक्रारींचे निवारण केल्याचा दावा केला आहे. मनुष्यबळाची उपलब्धता मर्यादित असतानाही बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात यश आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मात्र, उर्वरित तक्रारींचे निवारण कधी होणार, याकडे करदात्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार असलेल्या मिळकतकर विभागाकडे नागरिकांकडून विविध माध्यमांतून तक्रारी दाखल केल्या जातात. मिळकतकराची आकारणी, कराच्या रकमेत दुरुस्ती आणि अन्य करविषयक अडचणींसंदर्भात नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात.

या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी विभागावर आहे. त्यातच एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) आणि जनगणनेच्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नियमित कामकाजासाठी उपलब्ध मनुष्यबळावर मर्यादा आल्या आहेत.

अशा परिस्थितीतही गेल्या दोन महिन्यांत विभागाकडे विविध माध्यमांतून एकूण ७ हजार ८०५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये पीएमसी केअर, माहितीचा अधिकार (आरटीआय), लोकसेवा हक्क अधिनियम (आरटीएस), आपले सरकार आणि पीजी पोर्टल या माध्यमांचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींपैकी ९३ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उर्वरित सात टक्के तक्रारींच्या निवारणासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

महसूलवाढीसह सेवांच्या गुणवत्तेवर भर

नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे, करदात्यांच्या अडचणी दूर करणे आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करणे, ही विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. तक्रारींचे निवारण करताना उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासह कामकाजात समन्वय राखण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT