पुणे: पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सदनिका आणि मालमत्ताच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी 2026 मध्ये 14 हजार 537 मालमत्तांच्या (सदनिकांसह ) विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यातून शासनाच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाला सुमारे 609 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या जानेवारी 2025 च्या तुलनेत महसुलात 5 टक्क्यांची घट झाली आहे.
मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात 17 हजार 449 मालमत्तांची विक्री झाली होती. त्यामधून सुमारे 638 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरांत एक कोटीहून अधिक किमतीच्या सदनिकांना मागणी वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
पुणे शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांबरोबरच आसपासच्या भागात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेतनाचे पॅकेजेस कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच शहराच्या आसपास सदनिका (किंवा मालमत्ता) घेण्याचे प्रमाण वाढले आहेत. शहरात सध्या सर्व सुविधांयुक्त असलेल्या मालमत्ता किंवा सदनिका खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच सदनिकांच्या किमतीत वाढ झाली असून, त्यांच्या किमती किमान 50 लाख ते एक कोटींच्या पुढे पोहोचल्या आहेत.
अतिशय खास ठिकाणी सदनिकांच्या किमतीमध्ये अगदी पाच ते सहा कोटींच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे. याबाबत नाईट फॅंक इंडिया या सर्व्हे करणाऱ्या संघटनेने दिलेल्या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एक कोटी किमत असलेल्या मालमत्तांच्या नोंदणीत सर्वाधिक वाटा कायम राहिला आहे. जानेवारी 2026 या महिन्यात 50 लाख, एक कोटी ते अगदी अडीच कोटी रुपये या श्रेणीच्या मालमत्तांची मागणी वाढली असून, त्याचा वाटा अनुक्रमे 14 ते 29 टक्के एवढा आहे.
या भागात आहे मागणी (सूक्ष्म बाजारपेठा )
उत्तर:- जुन्नर , आंबेगाव , खेड
दक्षिण:- भोर , पुरंदर, बारामती, इंदापूर
पूर्व:- शिरूर, दौंड
पश्चिम:- मावळ, मुळशी , वेल्हे
मध्यवर्ती:- हवेली, पुणे शहर