Online Service Error Pudhari
पुणे

Pune E Search Service: पुण्यात नोंदणी विभागाचे ई-सर्च तीन महिन्यांपासून विस्कळीत; मोफत सरकारी सेवा ठप्प, खासगी ॲपवर पैसे मोजूनही फसवणूक

मालमत्ता दस्तांच्या शोधात तांत्रिक त्रुटी; ई-प्रमाण सेवेतही दीड हजार रुपये भरून माहिती मिळेना, चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी व मुद्रांक विभागाची ई-सर्च ही मोफत सुविधा गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. हे संकेतस्थळ कधी बंद, तर कधी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने दस्तऐवजांचा शोध घेण्याचे काम करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे, सरकारी सुविधा ठप्प असताना खासगी अ‍ॅपद्वारे पैसे आकारून ही सेवा सहज उपलब्ध होत असल्याने या संपूर्ण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दिल्ली येथील इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नितीन लेले यांनी याविरुद्ध तक्रार करीत आवाज उठविला आहे. यासंदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, वाघोली परिसरातील मालमत्तांचा, तर शोध अहवाल मिळतच नाही, तर वारजे परिसरातील दस्ताचा शोध घेताना पाषाण परिसरातील दस्तांची माहिती समोर येते.

या तांत्रिक त्रुटींमुळे शोध घेण्याचे काम अत्यंत अवघड झाले आहे. याबाबत विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रारी करण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांचीही भेट घेतली, तरीही त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सरकारी संकेतस्थळावरील माहिती खासगी अ‍ॅपचालकांना विकली जाते का? असा संशय लेले यांनी व्यक्त केला आहे. मोफत असलेली सरकारी सुविधा बंद ठेवून नागरिकांना सशुल्क खासगी सेवांकडे वळविण्याचा हा प्रकार आहे का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ई-प्रमाणमुळे गोंधळ, खासगी ॲपद्वारेही होतेय फसवणूक

नोंदणी विभागाने सुमारे महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या ई-प्रमाण या सशुल्क सेवेद्वारेही माहिती मिळत नसल्याची तक्रार ॲड. नीलेश टुले यांनी केली आहे. ई-सर्चवर १९८५ पासूनची माहिती मोफत मिळत होती. तर ई-प्रमाणवर तब्बल दीड हजार भरूनही २००२ नंतरचेच दस्त उपलब्ध आहेत. कित्येकदा तर पैसे भरूनही डाटा ब्लँकच येतो.

महासूची डॉट कॉममधून फसवणुकीची उदाहरणे

महासूची डॉट कॉमवर नोंदणी विभागाचा डाटा उपलब्ध असल्याचे रील्स व्हायरल होत असले, तरी या खासगी ॲपद्वारेही व्यावसायिकांची फसवणूक होत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. दस्तांची माहिती मिळविण्यासाठी या ॲपवर १४०० रुपये भरावे लागतात. असे पैसे भरूनही आवश्यक त्या दस्तांची माहिती उपलब्ध झाली नाही, असे ॲड. ऋषिकेश महाजन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT