Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; नगरसेवकांशी संबंधित बांधकामांवरही कारवाई, मार्चपर्यंत मोहीम सुरू राहणार

सात दिवसांत २.०५ लाख चौरस फूट जागा मोकळी; अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी ५० मागा, १०० पोलिस देतो, पोलिस आयुक्तांचे आश्वासन
Pune Encroachment Removal Drive
Pune Encroachment Removal DrivePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील अतिक्रमणांवरून प्रशासनाला जाब विचारणाऱ्या नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणेही आता महापालिकेच्या रडारवर आली आहेत. अतिक्रमण विभागातील कथित हप्तेखोरी, निवडक कारवाई आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून सभागृहात प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वर्तुळातच आता कारवाईचा बुलडोझर पोहोचला आहे. सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही हातोडा पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या नातेवाइकांचे अतिक्रमण हटविण्यापासून ते नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणांवर कारवाई करण्यापर्यंत प्रशासनाने भूमिका घेतल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे.

Pune Encroachment Removal Drive
Pune BDP Land Acquisition: पुण्यातील बीडीपी जमीनमालकांना १०० टक्के मोबदल्याची शिफारस; भूसंपादनाचा ९० टक्के भार राज्य सरकार उचलणार?

महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. अतिक्रमण कारवाईसाठी हप्ते घेतले जात असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही नगरसेवकांनी, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. प्रशासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेत सोमवारी वृद्धेश्वर परिसर, वडगाव फाटा, जेम कॉर्नर आणि कोथरूडमधील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांचाही समावेश होता. यापूर्वी कोथरूडमध्ये एका मंत्र्याच्या नातेवाइकाचे अतिक्रमणही हटविण्यात आले होते. ही कारवाई थांबविण्यासाठी फोनाफोनी झाल्याची चर्चा असतानाही प्रशासनाने माघार घेतली नाही. आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरभर कारवाई सुरू असून, रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आता नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणांवरही प्रशासनाची नजर राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Pune Encroachment Removal Drive
November Cold Weather: नोव्हेंबरमध्ये थंडी गायब! सलग तीन चक्रीवादळांचा परिणाम; यंदा शीतलहरीचे निकषही लागू नाहीत

आयुक्तांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे निवेदन

नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणांचा मुद्दा यापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेही उपस्थित केला होता. नगरसेवकांच्या कार्यालयांमध्येच कथित अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई होत असताना लोकप्रतिनिधींशी संबंधित अतिक्रमणांनाही हात लावणार का, असा सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला होता.

अतिक्रमणधारकांनो, सावधान! मार्चपर्यंत कारवाई करणार

शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू झालेली महापालिकेची मोहीम ही केवळ दोन महीने सुरू राहणार नसून मार्च २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहे. यानंतर देखील गरजेनुसार ही कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण करणारा सर्वसामान्य व्यावसायिक असो किंवा राजकीय व्यक्तीशी संबंधित असो, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, पुढील चार महिन्यांत महापालिकेची कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, पादचाऱ्यांना पदपथांऐवजी रस्त्यावरून चालावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. प्रमुख रस्ते, चौक, पदपथ, व्यावसायिक आस्थापना आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेप किंवा दबावाचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधितांवर अधिक कठोर कारवाई करण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.

Pune Encroachment Removal Drive
Kusegaon Bhanoba Yatra: कुसेगावच्या भानोबा यात्रेची जय्यत तयारी; लाखो भाविकांसाठी ग्रामस्थांचे नियोजन सुरू

अतिक्रमणांवर सातव्या दिवशीही हातोडा; २.०५ लाख चौ. फूट जागा मोकळी!

शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेचा सोमवारी सातव्या दिवशीही जोर कायम राहिला. केवळ मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यापुरती मर्यादित न राहता आता उपनगरांमधील अतिक्रमणांवरही प्रशासनाने हातोडा चालविला आहे. सोमवारी एकाच दिवशी सहा झोनमध्ये तब्बल २ लाख ५ हजार ८०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. हडपसर, धायरी, वारजे, कोरेगाव पार्क, पेठा आणि कर्वे रस्त्यापर्यंत कारवाईचा विस्तार करण्यात आला. आयुक्तांच्या थेट लक्षामुळे क्षेत्रीय कार्यालयांनीही कारवाईचा वेग वाढविला आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच व्यावसायिक इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांना लक्ष्य करण्यात येत आहे. सोमवारी झोन १ मध्ये हडपसर रस्ता आणि हडपसर चौक परिसरात सर्वाधिक ६७ हजार ५०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. झोन २ मध्ये वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरात ३८ हजार २०० चौरस फूट, तर झोन ३ मध्ये वारजे सर्व्हिस रोडवर १८ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली.

झोन ४ मध्ये ढोले पाटील रस्ता, ताडीवाला रस्ता आणि कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्त्यावर ४४ हजार ७०० चौरस फूट, तर नाना पेठ आणि रास्ता पेठेत १४ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या झोनमध्ये एकूण ५८ हजार ७०० चौरस फुटांवर कारवाई झाली. झोन ५ मध्ये टिळक रस्त्यावर ९ हजार ५००, तर झोन ६ मध्ये वृद्धेश्वर घाट, लॉ कॉलेज रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील फ्रंट व साइड मार्जिनमधील १३ हजार ५०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात करण्यात आली.

Pune Encroachment Removal Drive
Pune Dog Bite Cases: पुणे जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका; ९ महिन्यांत ७७ हजारांहून अधिक जणांना चावा, रेबीजचे १४ मृत्यू

सोमवारी येथे करण्यात आली कारवाई

  • झोन १ : हडपसर रस्ता, हडपसर चौक – ६७,५०० चौ. फूट

  • झोन २ : वडगाव बुद्रुक, धायरी – ३८,२०० चौ. फूट

  • झोन ३ : वारजे सर्व्हिस रोड – १८,४०० चौ. फूट

  • झोन ४ : ढोले पाटील रस्ता, ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क, नाना पेठ, रास्ता पेठ ५८,७०० चौ. फूट

  • झोन ५ : टिळक रस्ता – ९,५०० चौ. फूट

  • झोन ६ : वृद्धेश्वर घाट, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता १३,५०० चौ. फूट

  • एकूण २,०५,८०० चौ. फूट

फ्रंट, साइड मार्जिनही लक्ष्य

महापालिकेच्या नियमित कारवाईत प्रामुख्याने पथारी, हातगाड्या आणि तात्पुरत्या अतिक्रमणांवर हातोडा पडत होता. मात्र, नव्या मोहिमेत इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील कायमस्वरूपी अतिक्रमणांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे व्यावसायिक इमारतींच्या पुढील आणि बाजूच्या मोकळ्या जागा मोकळ्या होण्याची शक्यता आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी ५० मागा; १०० पोलिस देतो!

शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला पुणे पोलिसांचे पूर्ण सहकार्य आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ५० पोलिस कर्मचारी मागितल्यास १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताअभावी कारवाई रखडत असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.

महापालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात धडक कारवाई सुरू आहे. रस्त्यांवरील पथारीवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉल, फळ व भाजीविक्रेते, पत्र्याचे शेड आणि अनधिकृत बांधकामे हटविली जात आहेत. मात्र, कारवाईसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने अडथळे येत असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले होते. त्यामुळे दोन्ही यंत्रणांमधील समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला होता. यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली.

महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मागण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. मात्र, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना यापूर्वीच आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही शासकीय यंत्रणेने बंदोबस्त मागितल्यास तो उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. अतिक्रमण हटविताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहील. महापालिकेच्या कारवाईत पोलिसांकडून कोणताही अडथळा येणार नाही. उलट, मागणीपेक्षा अधिक मनुष्यबळ देण्याची तयारी आहे, असेही पोलिस आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

कारवाईला मिळणार बळ

अतिक्रमण हटविताना अनेकदा विक्रेते आणि संबंधितांकडून विरोध होतो. त्यामुळे वादावादी किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळाल्यास महापालिकेला कारवाई प्रभावीपणे करता येणार आहे. पोलिस आयुक्तांच्या आश्वासनामुळे अतिक्रमणविरोधी मोहिमेला आता अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.