

पुणे: नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित कडाक्याची थंडी अद्याप जाणवलेली नाही. यंदा किमान तापमानात सतत चढउतार होत असल्याने थंडीच्या लाटेचे शास्त्रीय निकषच लागू होत नसल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवले आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या सलग तीन चक्रीवादळांनी थंडी कमी केल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हवामान विभागाच्या २० नोव्हेंबरच्या विस्तारित अंदाजानुसार, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सामान्य ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, या कालावधीत देशाच्या कोणत्याही भागात शीतलहरींची शक्यता म्हणजेच थंडीच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सानप यांनी सांगितले निकष...
यंदा किमान तापमान १० अंशांखाली सातत्याने गेले नाही.
काही ठिकाणी ते गेले, त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगावचा समावेश आहे. मात्र, तेथील किमान तापमानात चढउतार दिसत आहे.
सलग तीन दिवस किमान तापमान ४.५ ते ५ अंशांवर जात असेल तरच त्याला थंडीची लाट म्हटले जाते.
उत्तर भारतातून येणारे थंड वारे, पश्चिमी विक्षोभ, ढगांचे आवरण आणि वाऱ्यांची दिशा यावर डिसेंबरमधील थंडीचा जोर अवलंबून राहणार आहे.