School Pudhari
पुणे

Pune Primary Schools Morning Session: मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलली; १३ ते ३० जुलै सकाळच्या सत्रात वर्ग

बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिलासा; जिल्हा परिषदेकडून सर्व पंचायत समिती शाळांसाठी नवे वेळापत्रक जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानसभा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १३ ते ३० जुलैदरम्यान पंचायत समितीअंतर्गत सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले.

सीईओ पाटील यांच्या निर्देशानुसार, मतदारयाद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी अनेक शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांना नियमित अध्यापनासोबतच बीएलओची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता यावी, यासाठी सकाळच्या सत्रात शाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिपत्रकानुसार शाळेची सुरुवात सकाळी ७ वाजता स्वच्छता व परिपाठाने होईल. त्यानंतर नियमित तासिका होऊन शाळा दुपारी १२.३० वाजता सुटेल. मात्र, शनिवारी शाळा नेहमीप्रमाणेच भरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

याशिवाय, बीएलओ म्हणून नियुक्ती नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार बीएलओ नियुक्त शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय कामात सहकार्य करावे तसेच शाळाप्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन करून बीएलओ शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

आधिपत्याखालील सर्व शाळांनी केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विहित नमुन्यात आणि निर्धारित कालावधीत जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT