Pune Unseasonal Rain Pudhari
पुणे

Pune Weather Update: प्री-मान्सूनच्या पावसाने पुणेकरांना दिलासा; अडीच महिन्यांनंतर तापमान 34 अंशांवर

उष्ण लहरींचा प्रभाव कमी; शहरात गारवा वाढला, मे महिन्यातील थंड वातावरणाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तब्बल अडीच महिने शहरांवर उष्ण लहरींचा प्रकोप सुरू होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, शुक्रवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहराचे कमाल तापमान 34 अंशांवर आले. त्यामुळे अडीच महिन्यातील पहिला रविवार पुणेकरांना आल्हाददायक ठरला.

शहरात यंदा मार्चपासूनच उकाडा सुरू झाला. एप्रिल आणि मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत तर अंगाची काहिली होत होती. कमाल तापमानाचा पारा तीन ते चार वेळा 43, तर एकदा लोहगावचे तापमान 44 अंशांवर गेले होते. एप्रिल ते मे महिन्यात शहराचे सरासरी तापमान 41 ते 42 अंशांवर स्थिर होते. मात्र, शहरातील उष्णता वर जात नसल्याने एकूण उष्मा जास्त जाणवत होता.

त्यामुळे रविवारी देखील पुणेकर घराबाहेर पडणे टाळत होते. रात्रीचे तापमानही वाढल्याने अहोरात्र पंखे, कुलर अन्‌‍ वातानुकूलित यंत्रणा सुरू होती. शुक्रवारी 22 मे रोजी शहरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने वातावरणात गारवा होता. सकाळी आठला शहराचे तापमान 41 ते 42 अंशांवरून थेट 34 अंशांवर आले. शनिवार आणि रविवारी हे तापमान 34 अंशांवर स्थिर होते. रविवारी सायंकाळी गार वारे बाहेर पडलेल्यांना सुखावत होता.

मे महिन्यातील तापमानाचे रेकॉर्ड...

(1991 ते 2020 च्या आकडेवारी नुसार)

  • मे महिन्यात शहराचे सरासरी तापमान 37 ते 40 अंशांवर असते. गत तीन दिवसांपासून ते 34 अंशांवर आहे.

  • सरासरी किमान तापमान 24 ते 27 अंशांवर असते, ते सध्या 22 ते 25 अंशांवर आहे.

  • सन 2005 ते 2015 या दशकात ः मे महिन्यातील तापमान 35 ते 37 अंशांवर

  • सन 2016 ते 2020 या कालावधीत शहरीकरण, कॉंक्रिटीकरण वाहन संख्येत प्रचंड वाढ झाल्याने शहर हीट आयलॅंड झाले. लोहगाव, मगरपट्टा, खराडी, कोरेगाव पार्क भागाचे तापमान सतत वाढू लागले आहे.

  • सन 2021 ते 2026 या कालावधीत हवामानातील अनिश्चितता वाढली.

  • प्री-मान्सूनमुळे मे महिना थंड राहू लागला.

  • मे 2025 मध्ये 270 मि.मी. पाऊस झाल्याने सर्वांत थंड मे महिना ठरला.

  • मे 2023 हे वर्ष दुसऱ्या क्रमांकाचे थंड वर्ष गणले गेले

  • मे 2026 तिसऱ्या क्रमांकावर थंड ठरले.

रविवारचे कमाल -किमान तापमान...

शिवाजीनगर 34 (25.4), पाषाण 34 (23), लोहगाव 36 (25.6), चिंचवड 34(25.8), लवळे 34 (22.8), मगरपट्टा 37 (25.2), एनडीए 33 (25), कोरेगाव पार्क 36 (26.8).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT